पेठवडगाव : वडगावच्या क्रीडा संकुलासाठी पंधरा दिवसात जमीन हस्तांतर करण्याचे लेखी आश्वासन आ.अशोकराव माने व तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिल्याने पंचक्रोशी क्रीडा संकुल कृती समितीच्यावतीने सुरू करण्यात आलेले बेमुदत धरणे आंदोलन शुक्रवारी (दि.२४) सांयकाळी तात्पुरते स्थगित करण्यात आले.
गेली वीस वर्षे वडगावमध्ये क्रीडा संकुल होण्याची मागणी होत आहे पण शासनस्तरावर त्याची योग्य दखल घेतली जात नाही. क्रीडा संकुलाबाबत ठोस निर्णय होण्यासाठी पंचक्रोशी क्रीडा संकुल कृती समितीच्या वतीने आज पालिका चौकात शुक्रवारी (दि.२४) सकाळी दहा वाजता शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून धरणे आंदोलनाची सुरवात करण्यात आली.
या आंदोलनाला माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ, माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी पाठिंबा व्यक्त केला. निमंत्रक विजय अपराध, माजी उपनगराध्यक्ष संदीप पाटील, जनसुराज्य पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षद पाटील (किणी),वारणा कारखानाचे संचालक सुभाष जाधव, वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे, वैभव कांबळे, वठारचे सरपंच सचिन कांबळे, राहुल पोवार, सूरज तवटे,अभिनंदन शिखरे,विकास नाईक,रणजित पाटील,सचिन पाटील,सागर गुरव,जगदीश पाटील, सागर चोपडे,रोहिणी पाटील,पूनम गुरव यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते,पदाधिकारी सहभागी झाले.
क्रीडा संकुलासाठी घेण्यात येणारी कोल्हापूर रोडलगतची जमीन शासनाच्या नावावर आहे. ती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी मागण्यात आला. तहसीलदार बेल्हेकर यांनी ही जमीन पंधरा दिवसात हस्तांतरित करण्याचे तर आ.माने यांनी या क्रीडा संकुलासाठी लागेल तो निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.