Published on
:
25 Jan 2025, 12:31 am
Updated on
:
25 Jan 2025, 12:31 am
कोल्हापूर : गर्भलिंग निदानाची माहिती देणार्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. राज्यात गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपाताला आळा घालण्यासाठी कडक पावले उचलली जात असून, येत्या काही दिवसांत ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झालेली दिसेल, असा विश्वासही त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
पालकमंत्री झाल्यानंतर आबिटकर शुक्रवारी कोल्हापुरात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, गर्भलिंग निदान चाचणी, अवैध गर्भपात याविरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलिस आणि वैद्यकीय प्रशासनाला दिल्या आहेत. याबाबत फ्लाईंग स्क्वॉडही स्थापन करण्यात येणार आहे. ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वयंसेवी संस्थांनाही सामावून घेतले जाणार आहे.
‘जीबीएस’ हा आजार जुनाच आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे सांगत याबाबत आवश्यक त्या सर्व सूचना संबंधितांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. आरोग्यमित्रांनी फेब—ुवारीत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत ते म्हणाले, आरोग्य योजनांची जबाबदारी ज्या कंपन्यांवर सोपवली आहे, त्यांच्याकडून या आरोग्यमित्रांची नेमणूक केली जाते. त्यांच्या मागण्यांबाबत कंपन्यांनी निर्णय घेतला पाहिजे. याबाबत संबंधितांशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.