सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे अधिकार्यांसमवेत आढावा बैठक घेताना.Pudhari Photo
Published on
:
25 Jan 2025, 12:41 am
Updated on
:
25 Jan 2025, 12:41 am
सोलापूर : सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारी सोलापूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजना ही खूप मोठी योजना आहे. या योजनेचे 90 टक्के पेक्षा अधिक काम झाले आहे. पाणी पंपिंग करण्यासाठी लागणारी वीज ही सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू. हा सौर ऊर्जा प्रकल्प झाल्यास महापालिकेची दरमहा लाखो रुपयांची वीज बचत होऊन हा निधी विकास कामांना वापरणे शक्य होणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांचा पदभार स्विकारल्यानंतर गोरे हे पहिल्यादांच सोलापुरात येऊन त्यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसात सात सुत्री कार्यक्रमाची उद्दिष्टपूर्तता करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व सर्व प्रशासकीय यंत्रणेने आपली जबाबदारी ओळखून कामे पूर्ण करावीत. या अंतर्गत सर्वसामान्यांना विविध सोयी सुविधा देण्याबरोबरच कार्यालयाची स्वच्छता करावी. तसेच ही स्वच्छता मोहीम राबवत असताना सर्वसामान्य नागरिकांना चांगली वागणूक देऊन त्यांची कामे त्वरित मार्गी लावण्याच्या दृष्टीने अधिकारी- कर्मचार्यांनी स्वतःच्या मनाची स्वच्छता ही केली पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले.
शासकीय कार्यालयात आता सीसीटीव्हीचा वॉच
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात येणार्या सर्वसामान्य नागरिकांना त्या त्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी कशा पद्धतीची वागणूक देतात याची माहिती मिळण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयात व्हाईस सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा बसवावी, त्यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येईल. तसेच कार्यालयात येणार्या नागरिकांची कशा पद्धतीने वागावे याबाबत सर्व अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण द्यावे अशा सूचना अधिकार्यांना दिल्या.
100 दिवसांत विमानसेवा सुरु होणार
मुख्यमंत्री फडणवीस यांचा शंभर दिवसात उद्दिष्ट पूर्तता कार्यक्रमाची सविस्तर माहिती देत सोलापूर विमानतळ विषय सविस्तर माहिती देऊन पुढील 100 दिवसांत येथून प्रवासी विमान वाहतूक सुरू होऊ शकते, अशी माहितीही गोरे यांनी दिली.