कासेगाव : स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी सातारा भागातून प्रतिसरकार स्थापन केले होते. त्याचप्रमाणे लोकशाहीतील सध्याच्या हुकूमशाहीला हाकलून लावण्यासाठी प्रतिसरकारची स्थापना करण्याची गरज आहे. क्रांतिवीर बाबूजी पाटणकर यांचे स्वातंत्र्य लढ्यासाठी मोठे योगदान होते. धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी डॉ. भारत पाटणकर यांनी लढा उभा केला आहे. या लढ्याला आमचा हातभार राहील, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी केले.
वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे क्रांतिवीर बाबूजी पाटणकर यांचा 73 वा आठवण दिवस व क्रांतिवीर बाबूजी पाटणकर लोकशास्त्रीय संशोधन व प्रबोधन संस्थेचा 39 वा वर्धापन दिवस अशा कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. येथील चावडी चौकात झालेल्या कार्यक्रमास माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री विश्वजित कदम, डॉ. भारत पाटणकर, कॉ. संपत देसाई, माजी आमदार मानसिंगराव नाईक उपस्थित होते.
खा. पवार म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेकांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. शिराळा, कासेगाव, वाळवा, कराड ही गावे क्रांतिकारकांची गावे आहेत. वसंतदादा पाटील, लोकनेते राजारामबापू पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले. बाबूजी पाटणकर अखेरपर्यंत म्हणजे स्वातंत्र्य मिळेपर्यंत भूमिगत राहिले. इंग्रजांना हाकलण्यासाठी लढत राहिले. ते इंग्रज पोलिसांना कधीही सापडले नाहीत. इंग्रज पोलिसांशी त्यांना अनेकवेळा समोरासमोर चकमकी कराव्या लागल्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा ते कष्टकरी जनतेच्या बाजूने लढत राहिले. तोच वारसा डॉ. भारत पाटणकर यांनी पुढे सुरू ठेवला. डॉ. पाटणकर धरणग्रस्तांच्या पाठीशी राहिले आहेत. त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचेे काम त्यांनी केले आहे. यापुढील लढ्याला आमचे पाठबळ राहील, अशी ग्वाही खा. पवार यांनी दिली.
आ. जयंत पाटील म्हणाले, सत्तेमध्ये गेलेल्यांचे काय विचार आहेत आणि सत्तेच्या बाहेर असणार्यांचे काय विचार आहेत, याविषयी जनता कधी विश्लेषण करते का? हा प्रश्न सर्वांना पडत असेल. कोणत्या विचारांना सत्तेत बसू द्यायचे आणि कोणत्या विचारांना सत्तेच्या बाहेर ठेवायचे, याविषयी काहीच तारतम्य राहिलेले नाही. त्यामुळे विचारांचं स्वातंत्र्य मिळाल्यावर आमचे विचार भरकटायला लागले आहेत.
ते म्हणाले, देश स्वतंत्र झाला त्यावेळी ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळविणे हाच एकमेव उद्देश होता. पंडित नेहरूंनी, या देशामध्ये समाजवादी विचारसरणी असली पाहिजे, ही भूमिका मांडली. माजी मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, क्रांतिवीर बाबूजी पाटणकर यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी जिवाची बाजी लावली. डॉ. भारत पाटणकर यांनी संस्था स्थापन करून धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. माजी मंत्री आ. डॉ. विश्वजित कदम म्हणाले, क्रांतिवीर बाबूजी पाटणकर यांनी या मातीतून स्वातंत्र्य लढ्यासाठी मोठे योगदान दिले. कासेगावची भूमी पवित्र आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, बर्डे गुरुजी, बाबूजी पाटणकर यांनी या मातीतून ठसा उमटविला आहे. डॉ. भारत पाटणकर यांनी संपूर्ण आयुष्य सर्वसामान्यांसाठी वेचले आहे. पुनर्वसित लोकांसाठी त्यांचे मोठे काम आहे. यावेळी डॉ. भारत पाटणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. जयंत निकम यांनी स्वागत केले. संदीप पाटील यांनी आभार मानले. माजी सभापती रवींद्र बर्डे, अॅड. बी. डी. पाटील, माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील, जयदीप पाटील, संतोष गोसल, सुभाष माने, मिलिंद पाटसुते तसेच धरणग्रस्त व श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.