Published on
:
25 Jan 2025, 12:28 am
Updated on
:
25 Jan 2025, 12:28 am
सोलापूर : बहुचर्चित असणारा शक्तिपीठ महामार्ग हा सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यातून जाणार आहे. या भागात धरणग्रस्त, बाधित लाभक्षेत्र असल्याने शक्तिपीठ महामार्गाला शेतकर्यांनी विरोध केला आहे. हा महामार्ग दुसरीकडून घेऊन जावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. त्यासाठी बाधित शेतकर्यांनी शुक्रवारी (दि. 24) पूनम गेटसमोर धरणे आंदोलन केले.
शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादन होणार असल्याने त्यांची शेती जाणार आहे. शक्तिपीठ महामार्गास वेगवेगळ्या जिल्ह्यातून विरोध होत असतानाच आता सोलापुरातील शेतकरीही आक्रमक झाले आहेत. सोलापुरातील शेतकर्यांनी धरणे आंदोलन करीत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने जर यावर तोडगा नाही काढला तर शेती मोजण्यासाठी येणार्या अधिकार्याला शेतात पाऊल ठेवू देणार नाही. पुढील काळात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे.
यावेळी बार्शी येथील गणेश घोडके, विजयकुमार पाटील, हनुमंत जाधव, राहुल भड, दत्ता काकडे, अप्पा पवार उपस्थित होते. शक्तिपीठ महामार्ग हा जिल्ह्यातील बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, सांगोला या तालुक्यातून जाणार आहे. यासाठी शेतकर्यांच्या जमिनी जाणार आहेत. याबाबतचे नोटिफिकेशन सरकारने प्रसिद्ध केले आहे. पण, शेतकर्यांचा विरोध होऊ लागल्याने सरकार आता काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शेतकर्यांमध्ये दोन मतप्रवाह
शक्तिपीठ महामार्गासाठी काही शेतकर्यांनी पाठिंबा दिला आहे. आमच्या जमिनी त्यामध्ये जाणार आहेत. त्यामुळे त्या जमिनीचा चांगला मोबदला आम्हाला द्यावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. त्यामुळे या महामार्गाबाबात शेतकर्यांमध्ये दोन मतप्रवाह असल्याचे स्पष्ट झाले आहे.