कोल्हापूर : महाराष्ट्रातील स्थानिक उद्योजकांना दावोसला नेऊन तेथे महाराष्ट्रात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा दावा करणे ही महाराष्ट्राची फसवणूक आहे, असा टोला माजी केंद्रीय मंत्री, खा. शरद पवार यांनी राज्य सरकारला लगावला. कोल्हापुरात एका कार्यक्रमानिमित्त आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. तसेच, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री करार करण्यासाठी की, पक्ष फोडण्यासाठी दावोसला गेले होते, असा सवालही त्यांनी केला.
मुख्यमंत्री असताना आपणही अनेकवेळा दावोसला जाऊन करार केले आहेत; पण राज्य शासन सध्या जे करार केल्याचे सांगत आहे त्या कंपन्या महाराष्ट्रात आधीपासूनच आहेत. भारत फोर्ज पुण्याची कंपनी आहे, जिंदाल कंपनीने आधीच महाराष्ट्रात गुंतवणूक केली आहे. याचाच अर्थ गुंतवणूक करण्याचे आधी ठरवले होते, तर मग त्या सगळ्यांना तिकडे निमंत्रित करण्यात आले. त्यानंतर तिथून त्यांना महाराष्ट्रात आणले, असा दिखावा करण्यात आल्याचा आरोप पवार यांनी केला.
राजकीय भूकंपाची मी वाट पाहत आहे
दावोसला उद्योगांचे करार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत गेले होते; पण तिथे गेल्यावर राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार असून, शिवसेना ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार, 10 माजी आमदार आणि काँग्रेसचे 5 आमदार लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा उदय सामंत यांनी केला. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, सामंत दावोसला करार करण्यासाठी गेले होते की, पक्ष फोडायला. त्यांनी दावोस येथून जी काही विधाने केली, ती पाहता मुख्यमंत्र्यांच्या दौर्याचा उद्देश होता, त्याच्याशी सुसंगत नव्हता. मीही राजकीय भूकंपाची वाट बघतोय, असेही पवार यांनी सांगितले.
स्वबळावर लढण्याबाबत चर्चा करू
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार, असे उद्धव ठाकरे सांगत आहेत याबाबत विचारले असता, दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपली भेट घेतल्याचे सांगत पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचे त्यांचे मत असल्याचेही माझ्यासमोर व्यक्त केले आहे. महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे स्वतंत्र लढण्याचा विचार करत असतील, तर त्याविषयी महाविकास आघाडीत सामंजस्याने विचार करण्यात येईल; पण याबाबत त्यांची टोकाची भूमिका नव्हती, असे पवार यांनी सांगितले. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिंदे गटाचा बीकेसीत, तर उद्धव ठाकरे गटाचा अंधेरीत मेळावा पार पडला. उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला तुलनेने अधिक गर्दी होती, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आपण बंद खोलीत चर्चा केली, ती राष्ट्रवादी पक्षाबाबत नव्हे, तर एका प्रकल्पाबाबत केली, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिले. नवीन सहकारमंत्र्यांना आपल्याशी दोन-तीन विषयांवर बोलायचे होते, त्यामुळेच त्या कार्यक्रमात खुर्चीची अदलाबदल केली, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील विरोधी पक्षांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कायम टीका करतात. त्यांची बोलण्याची भाषा ही अति टोकाची असते, ते कोल्हापूरचे जावई आहेत; पण हे काही कोल्हापूरचे संस्कार नाहीत, असा टोला शरद पवार यांनी लगावला.या पत्रकार परिषदेला पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, नंदाताई बाभुळकर, रामराजे कुपेकर आदी उपस्थित होते.