Published on
:
25 Jan 2025, 12:36 am
Updated on
:
25 Jan 2025, 12:36 am
बेळगाव : फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरलेल्या तारिहाळमधील एका शेतकर्याचे घर जप्त करण्याचा प्रकार शुक्रवारी (दि. 24) घडला. जप्तीवेळी चक्क ओल्या बाळंतिणीला अर्भकासह घराबाहेर काढण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तारिहाळमधील गणपती राचमंद्र लोहार यांनी घर बांधकामासाठी एका फायनान्स कंपनीकडून पाच लाखांचे कर्ज घेतले होते. सलग तीन वर्षे त्यांनी हप्ते भरले. परंतु, वृद्ध आईचे आजारपण आणि मुलीच्या बाळंतपणामुळे सहा महिन्यांपासून हप्ते थकले होते. यामुळे फायनान्स कंपनीने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस आणि वकिलांच्या उपस्थितीत घरावर जप्ती आणण्यात आली. यामुळे बाळंतपणासाठी आलेली मुलगी, अर्भक व त्यांचे सर्व कुटुंब रस्त्यावर आले. घराच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये त्यांना आसरा घ्यावा लागला. फायनान्स कंपनीकडून एकाचवेळी 7.50 लाख रुपये भरावेत, असा तगादा लावण्यात आला आहे. परंतु, गरीब परिस्थितीमुळे पैसे जमा करणे शक्य नसल्याने लोहार कुटुंब उघड्यावर पडले आहे.
मंत्री हेब्बाळकरांकडून दखल
या प्रकाराची माहिती मिळताच महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी त्याची तत्काळ घेतली. रुग्णालयात उपचार घेत असूनही त्यांनी लागलीच आपल्या स्वीय साहाय्यकाला तारिहाळला पाठविले. फायनान्स कंपनीच्या अधिकार्यांशी चर्चा करुन कर्ज भरण्यास सवलत मागितली. जप्त केलेले घर पुन्हा मालकाकडे सोपविण्याची सूचना केली. व जीवनोपयोगी साहित्याची भेट लोहार कुटुंबाला दिली. ग्रा. पं. अध्यक्ष नामदेव जोगण्णावर, लक्ष्मण मुचंडी, रमेश जळकण्णावर, स्वप्नील जाधव, कृष्णा पाटील, स्वीय साहाय्यक महांतेश हिरेमठ उपस्थित होते.
महिनाभरापासून बेळगावसह राज्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सामान्यांना कर्जवसुलीसाठी त्रास दिला जात आहे. कर्जवसुलीसाठी तगादा लावणे, धमकी देणे असे प्रकार होत आहेत. याकडे राज्य सरकारने गंभीरपणे लक्ष दिले असून दोषीवर कारवाई करण्यात येईल. काही महिलांनाही फसवण्याचे प्रकार झाले आहेत. याबाबत जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली असून याबाबत महिनाभरात तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिली.