जत : लोकनेते स्वर्गीय बसवराज पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन माजी केंद्रीयमंत्री खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, खा. विशाल पाटील, आमदार अरुण लाड, आमदार रोहित पाटील, सरपंच सुभाष पाटील.
Published on
:
25 Jan 2025, 12:40 am
Updated on
:
25 Jan 2025, 12:40 am
संख/जत : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाच्या विकासाला चालना देण्याचे काम केले. जतच्या दुष्काळी भागाला पाणी मिळावे आणि विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी संघर्ष करणार्या राजारामबापू यांच्या संघर्षात संखचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते, ते केवळ बसवराज पाटील यांच्यामुळे. ते जनमानसातील नेतृत्व होते. त्यांनी दुष्काळी तालुक्यातील शेती, पाणी आणि वीज यांसह मूलभूत प्रश्नांसाठी दिलेला लढा आणि संघर्ष न विसरण्याजोगा आहे. त्यांच्या मनातील अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले.
संख येथे जि. प.चे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण माजी मंत्री खा. शरद पवार यांच्याहस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी प.पू. श्री श्री गुरुपाद शिवाचार्य महास्वामीजी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, कर्नाटकचे मंत्री शिवानंद पाटील, खा. विशाल पाटील, माजी खासदार संजय पाटील, आमदार अरुण लाड, आमदार रोहित पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार विक्रम सावंत आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, राजारामबापू पाटील यांच्या संघर्षाचे विचार घेऊन वाटचाल करणार्या बसवराज पाटील यांनी जतसारख्या दुष्काळी भागातील शेती, पाणी व विजेच्या प्रश्नांसाठी लढा दिला. त्यांच्या विचारांचा वारसा जपणार्या पिढीला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. यावेळी आ. जयंत पाटील, खा. विशाल पाटील यांची भाषणे झाली.