Published on
:
24 Jan 2025, 6:09 pm
Updated on
:
24 Jan 2025, 6:09 pm
नागपूर : एकीकडे शहर पोलीस आणि महानगरपालिकेतर्फे शहरात फुटपाथ मोकळे करण्याची, अतिक्रमण हटविण्याची कारवाई जोरात सुरू आहे. दुसरीकडे आज शुक्रवारी अतिक्रमण कारवाईत दुकानातील फर्निचर साहित्य नेल्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा संताप व्यक्त करीत दिव्यांग बांधवांनी महापालिका मुख्यालयात फुलझाडे, कुंड्याची तोडफोड केली. विदर्भ विकलांग संघर्ष समिती अध्यक्ष गिरीधर भजभूजे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
इकबाल भाई यांचे फर्निचर साहित्य अतिक्रमण विभागाने उचलून नेल्याने त्यांनी अंगावर रॉकेल टाकून स्वतः जाळून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तातडीने मनपा सुरक्षारक्षक, पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरम्यान थेट विधान भवन प्रवेशद्वारापर्यंत या दिव्यांग संघर्ष समितीच्या नेतृत्वात दिव्यांग बांधवांनी धडक दिली होती. याचाच सूड या पद्धतीने प्रशासनाने उगवल्याचा आरोप संघर्ष समितीचे अध्यक्ष भजभुजे यांनी केला.