अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्वाचा अधिकार रद्द करण्याचा घेतलेला निर्णय स्पष्टपणे असंवैधानिक असल्याचे सांगत फेडरल कोर्टाने त्यांच्या पहिल्याच कार्यकारी आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे लाखो हिंदुस्थानींसह स्थलांतरित नागरिकांचा जीव भांडय़ात पडला आहे. वॉशिंग्टन, ऑरिझोना, इलिनॉय आणि ओरेगॉन या चार डेमोव्रेटिक राज्यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती.
चार राज्यांनी केलेल्या मागणीनंतर न्यायाधीशांनी ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात तात्पुरता प्रतिबंधात्मक आदेश जारी केला. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी त्याला रोख लागली आहे.
इतके असंवैधानिक प्रकरण पाहिले नाही – फेडरल कोर्ट
सुनावणीदरम्यान न्याय विभागाचे वकील सातत्याने अडथळा आणत होते. त्यावर न्यायाधीश संतापले आणि वकिलांना विचारले, हा आदेश घटनात्मक कसा मानता येईल? हे मनाला अत्यंत त्रासदायक आहे. हा स्पष्टपणे असंवैधानिक आदेश आहे. गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ मी खंडपीठावर आहे, परंतु इतके असंवैधानिक प्रकरण मी आजतागायत पाहिले नाही, अशी टिप्पणीही न्यायाधीश कफनॉर यांनी केली.
22 राज्यांच्या महाधिवक्त्यांचा विरोध
ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात 22 राज्यांच्या महाधिवक्त्यांनीदेखील फेडरल डिस्ट्रिक्ट कोर्टात धाव घेतली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि काँग्रेस (संसद) यांना 14 व्या दुरुस्तीअंतर्गत जन्मसिद्ध नागरिकत्वावर बंदी घालण्याचा घटनात्मक अधिकार नाही, असा युक्तिवाद महाधिवक्त्यांनी केला. राष्ट्राध्यक्ष शक्तिशाली आहे, परंतु तो राजा नाही. कलमाच्या फटक्याने राज्यघटनेचे पुनर्लेखन करू शकत नाही, असे न्यू जर्सीचे महाधिवक्ता मॅथ्यू प्लटकिन म्हणाले.
फेडरल कोर्टाच्या दणका; हिंदुस्थानींसह लाखो स्थलांतरितांना दिलासा, अमेरिकेतील 538 बेकायदेशीर स्थलांतरित गुन्हेगारांना अटक
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारवाईच्या इशाऱयानंतर अमेरिकेने 538 बेकायदेशीर स्थलांतरित गुन्हेगारांना अटक केली आहे. यामध्ये एका संशयित दहशतवाद्याचा समावेश असून काहींना अल्पवयीन मुलांविरुद्ध लैंगिक गुह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेव्रेटरी कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, ट्रम्प प्रशासनाने बेकायदेशीर स्थलांतरित गुन्हेगारांना लष्कराच्या विमानांद्वारे हद्दपार केले. सध्या इतिहासातील सर्वात मोठी हद्दपारीची कारवाई सुरू आहे. प्रशासनाने आश्वासन दिल्याप्रमाणे त्याची पूर्तता केली जात आहे. तसेच अटक केलेल्यांमध्ये संशयित दहशतवाद्यासह ट्रेन डी अरागुआ टोळीचे चार गुंड आणि अवैध लोकांचा समावेश आहे.