हिंगोलीत मांडूळाची तस्करी:पाच जणांना वन विभागाच्या पथकाने पकडले, एक मांडूळ जप्त
5 hours ago
1
हिंगोली शहरालगत बळसोंड भागात मांडूळाची तस्करी करणाऱ्या पाच जणांना वन विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी ता. २४ अटक केली आहे. त्यांच्याकडून एक मांडूळ जप्त केले असून अटक केलेल्या पाच जणांपैकी तिघे जण वाशीम जिल्हयातील आहेत. त्यामुळे विदर्भातही मांडूळ तस्करी केल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सुत्रांनी सांगितले. याबाबत वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरालगत बळसोंड येथे एका व्यक्तीकडे काही जण मांडूळ विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यावरून विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, सहाय्यक वनसंरक्षक सचीन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, विश्वनाथ टाक, लियाकत अली, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, वन विभागाचे कर्मचारी एस. एस. चव्हाण, एस. टी. काळे, एस. जे. शिंदे, महादु शिंदे यांच्यासह पथकाने आज दुपारी डमी ग्राहक पाठविले. यावेळी बळसोंड येथील विठ्ठल गायकवाड यांच्या घरात मांडूळ आणून ठेवले होते. डमी ग्राहकाने मांडूळ पाहून सौदा पक्का केला. त्यानंतर वन विभाग व पोलिसांच्या पथकाने विठ्ठल याच्या घरावर छापा टाकला. यामध्ये वन विभागाने एक मांडूळ जप्त केले आहे. याप्रकरणी विठ्ठल गायकवाड, (रा. बळसोंड, हिंगोली), गजानन कांबळे (रा. चिंचोली, जि. वाशीम), गजानन वाणी (रा. बामणगाव जि. वाशीम), नंदू वानखेडे (रा. सोनाळा, जि. वाशीम), देवानंद कांबळे (रा. बोरी बुद्रूक, जि. हिंगोली) यांच्या विरुध्द वन्यजिव अधिनियमानंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वन विभागाने त्यांना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे डॉ. नाळे यांनी सांगितले. दरम्यान, अटकेतील पाच जणांपैकी तीघे जण विदर्भातील असून त्यांनी यापुर्वीही विदर्भात मांडूळ तस्करी केल्याचा संशय आहे. त्यानुसार वन विभागाने आरोपींची माहिती घेण्यास सुरवात केली आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)