पोलिसिंगची लाइन सोडाल तर खबरदार!Pudhari
Published on
:
24 Jan 2025, 9:32 am
Updated on
:
24 Jan 2025, 9:32 am
पुणे: जे पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात निर्धारित नियमांनुसार काम करतील तेच तेथे टिकतील अन्यथा त्यांची उचलबांगडी अटळ आहे. आमचे नियम सरळ आहेत. कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे आम्हाला नको आहेत. हद्दीतील गुन्हेगारांवर वचक हवा. पारदर्शक पोलिसिंगची लाइन सोडता कामा नये.
गुन्हेगार जर पोलिसांना आव्हान देत असतील, तर त्या प्रभारी अधिकार्यांचे हे अपयश आहे. त्यामुळे काम न करणार्या पोलीस निरीक्षकांची बदली अटळ असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
मागील वर्षभरात दर दोन ते तीन महिन्यांनी पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या होत आहेत. यावर पोलीस आयुक्तांनी परखड भूमिका घेत अवैध धंद्याबाबत माझी नो टॉलरंन्स झोन अशी भूमिका आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे आणि गैरप्रकार बंदच असले पाहिजेत. यामुळे कोणी जर कारवाईला फाटा देत असेल, तर त्याची उचलबांगडी होणारच, असे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.
पोलीस निरीक्षकांच्या सतत होणार्या बदल्यांमुळे पोलीस दलात खदखद आहे. पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्राची माहिती होण्याअगोदरच बदल्या होत असल्याने गुन्हेगारी नियंत्रणात आणायची कशी, असा प्रश्न अनेक अधिकारी विचारत होते.
यावर अमितेश कुमार म्हणाले, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीत पोलिस अधिकार्यांच्या बदल्या झाल्या. त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या वेळेसही बदल्या कराव्या लागल्या. मात्र, आता काही झालेल्या बदल्या या आमच्या भूमिकेशी घेतलेल्या फारकतीमुळे झाल्या आहेत. सराईत गुन्हेगारांकडून हद्दीत सातत्याने गुन्हे होणे, अवैध धंदे आणि गैरप्रकारांमुळे बदल्या कराव्या लागत आहेत.