आरोपी अटकेत; डकैतीची रक्कम मात्र गायब
पत्रकार काळे व अबरार अज्जूची सुद्धा कार्यतत्परता
धामणगाव रेल्वे (Bharat Finance Company) : भारत फायनान्स कंपनीच्या फिल्ड असिस्टंटला रस्त्यावर मारहाण करून तब्बल दोन लाखांच्या वर रक्कम हिसकावून नेल्याची घटना तालुक्यातील शहापुर ते जुना धामणगाव रस्त्यावर घडली. सदर घटनेत दत्तापुर पोलिसांनी डकैतीचे कलमांव्ये गुन्हा दाखल केला असून घटनास्थळावर पकडल्या गेलेल्या अटकेतील दोन आरोपींना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दत्तापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून बुधवारी दि.२२ जानेवारीच्या रात्री ८ वाजता दरम्यान अंजनसिंगी कडे जाणाऱ्या शहापुर ते जुना धामणगाव रस्त्यावर भारत फायनान्स कंपनीच्या दत्तापूर शाखेतील (Bharat Finance Company) फिल्ड असिस्टंट यश अनिल राठोड वय १९ रा. आर्वी ता आर्वी जि वर्धा हे त्यांच्या दुचाकीने मजदी येथून बँकेच्या वसुलीची रक्कम घरून शहरातील दत्तापुर शाखेत येत असतांना शहापुर ते जुना धामणगाव रस्त्यावर असलेल्या गोडावुन समोर त्यांचे पाठीमागुन एक काळया रंगाची शाईन कंपनीचे दुचाकीवर दोन इसम आले व अचानकपणे त्यांना बेदम मारहाण करून यश राठोड यांच्याजवळ असलेल्या भारत फायनान्स कंपनीची बॅगेतील बँकेच्या वसुलीची २ लाख ७ हजार ४९८ रूपये रक्कम व कंपनीने दिलेला सॅमसंग कंपनीचा टॅब अंदाजित किंमत १० हजार व सिजीटी अमाउंट नगदी ३३५ असा एकूण २ लाख १७ हजार ८३३ रूपयाचा मुददेमाल दोघांनी जबरीने हिसकावला.
सुदैवाने त्याचवेळी त्याचवेळी धामनगाव येथील प्रसारमाध्यम प्रतीनिधी बोधीसत्व काळे व अबरार (अज्जू) हे तिवसा येथुन त्यांचे काम आटोपुन परत येत असतांना त्यांना सदर घटना निदर्शनास आली. (Bharat Finance Company) प्रथमदर्शी त्यांना सदर घटना ही अपघात वाटल्याने ते मदती करीता पुढे सरसावले असता लगेचच सदर घटना ही अपघात नसुन जबरी चोरीचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आला म्हणुन जबरी चोरी करुन पळून जाण्याच्या बेतात असलेल्या दोन्ही आरोपीना त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता यातील आरोपी सचीन पंधरे रा. यवतमाळ यास पकडण्यात ते याशस्वी झाले. तर त्याचा साथीदार विशाल सहारे हा मोटरसायकलने घटनास्थळावरुन पसार झाला होता. सदर घटनेची माहीती बोधीसत्व काळे व अबरार यांनी पो.स्टे. दत्तापुर यांना दुरध्वनीव्दारे दिल्याने पो.स्टे. दत्तापुर येथील पोलीस पथक त्वरीत घटनास्थळावर दाखल झाले व आरोंपीस ताब्यात घेऊन भारतीय न्याय संहितेच्या कलम कलम ३०९ (४), ३०९ (६),३(५) गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर घटनेची माहीती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दुस-या आरोपीच्या शोधार्थ यवतमाळ येथे रवाना झाले होते. यवतमाळ येथे आरोपीचा शोध घेवुन आरोपी विशाल सहारे यास गुन्हयात वापरलेल्या दुचाकीसह ताब्यात घेण्यात आलेले आहे व पुढील तपासकामी पो.स्टे. दत्तापुर यांना सुपुर्द करण्यात आले आहे. पुढील तपास दत्तापुर पोलीस करीत आहेत.
घटना घडत असतांना पिडीतास मदत व आरोपी यांना पकडण्यात दाखविलेले धैर्य व समयसूचकता याबाबत बोधीसत्व काळे व अबरार (अज्जू) यांना अमरावती ग्रामीण पोलीस दलातर्फे कौतुक करण्यात येत आहे. डकैतीत लुटलेली रक्कम मात्र अद्यापही पोलिसांनी मिळालेली नसून ठाणेदार गिरीश ताथोड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोउपनि विकास राठोड सदर प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. तसेच नागरीकांनी सदैव सभोवताल घडणा-या घटनांबाबत जागरुक राहण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडून करण्यात येत आहे.