मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला असला तरी अद्याप ते वर्षा बंगल्यावर (Varsha Bunglow) राहायला गेलेले नाहीत. या बंगल्यात काळी जादू (Black Magic) करण्यात आली आहे, रेंड्यांची शिंगं बाहेर लॉनमध्ये पुरण्यात आली आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुती सरकारला फटकारले आहे. महाराष्ट्राचं मंत्रीमंडळ हा वेड्यांचा, अंधश्रद्धावाल्यांचा बाजार आहे, अशी टीका त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
”महाराष्ट्राचं मंत्रीमंडळ हा वेड्यांचा, अंधश्रद्धावाल्यांचा बाजार आहे. नाशिकच्या पत्रकारांनी मला मुख्यमंत्री वर्षावर राहायला का जात नाही याबाबत मला प्रश्न केला. पत्रकारांनी प्रश्न केला म्हणजे त्यांच्यातही काहीतरी कुजबूज सुरू आहे. त्यांनी विचारल्यानंतर मी त्यांना माझ्याकडची माहिती दिली. मी देखील पत्रकार आहे, मला देखील लोकं माहिती देतात. मुख्यमंत्री कुणीही झाला तरी ते वर्षा बंगल्यावर धाव घेतात. पण आपले मुख्यमंत्री जात नाहीत. कारण सध्या ते ताक फुंकून पित आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलीची दहावीची परीक्षा आहे त्यामुळे सध्या ते वर्षावर जात नाहीएत. मी त्यांच्या मुलीला शुभेच्छा देतो की ती बोर्डात पहिली येऊन दे. पण सागर रामटेकला आहे आणि वर्षा लखनौला आहे असं नाही ना. सागर बंगल्यात आणि वर्षामध्ये पाच पाऊलांचं अंतर आहे. तरी पण मुख्यमंत्री वर्षावर जात नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.
”जादूटोण्याची कारावाई करायची असेल तर एकनाथ शिंदे व त्यांच्या चाळीस आमदारांवर करा. जे कामाख्या देवीला गेले व रेडे कापून येऊन सत्तेवर बसले. त्यांच्यावर कारवाया करा. कारावाया केल्या तर प्रधानमंत्र्यांपासून सर्वांवर कारवाया कराव्या लागतील. काही विषय श्रद्धेचे असतात तर काही विषय अंधश्रद्धेचे असतात. मूळात एकनाथ शिंदेचं सरकार अंधश्रद्धेतून तर फडणवीसांचं सरकार ईव्हीएम घोटाळ्यातून निर्माण झालं होतं हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. त्यामुळे मी काय सांगतोय ते समजून घ्यायला शहाणा माणूस पाहिजे, आम्ही शिवसेना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची माणसं काय सांगतात ते त्यांना कधीच समजणार नाही. कारण यांच्या डोक्यात गुंगी भरली आहे. हे गुंगीत आहेत सर्व, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.