Published on
:
17 Nov 2024, 7:06 am
Updated on
:
17 Nov 2024, 7:06 am
नाशिक : राज्यातील सरकार हे उद्योजक गौतम अदानी चालवत आहेत. तेच सरकार पाडतात, त्यांचे सरकार आणतात. त्या मोबदल्यात मुंबईसह देशभरातील महागड्या जमिनी घशात घालत आहेत, असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस प्रवक्त्या, सोशल मीडिया अध्यक्ष सुप्रिया श्रीनेत यांनी पत्रकार परिषदेत केला.
शहरामध्ये काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत श्रीनेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात द्वेष नाही, तर प्रेमाने निवडणुका लढवल्या जातात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे राज्यात येऊन 'बटेंगे तो कटेंगे' अशा द्वेषपूर्ण घोषणा देऊन गेले. मात्र त्यामुळे महायुतीतच मतभेद निर्माण झाले आहेत. कारण त्यांनाही या घोषणा आवडलेल्या नाहीत. भाजप सरकार हे उद्योजकधार्जिणे असून, त्यांना अरबो रुपयांची कर्जमाफी दिली जाते मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही. राज्यातील उद्योगधंदे गुजरातमध्ये पळवले. मात्र आता महाराष्ट्र याचा बदला घेणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यात महिला, युवा, शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना लागू केल्या जातील. तसेच राज्यातील कमिशनमधून होणारा भ्रष्टाचार संपवून जनतेला जास्तीत जास्त आर्थिक फायदा पोहोचवला जाईल, असे मतही श्रीनेत यांनी व्यक्त केले. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड, कमिटी प्रवक्ता शुभ्रांशू राय आदी उपस्थित होते.