महायुतीच्या उमेदवार स्नेहा दुबे-पंडित यांच्या प्रचारानिमित्ताने मार्गदर्शन करताना देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह.Pudhari News Network
Published on
:
17 Nov 2024, 9:37 am
Updated on
:
17 Nov 2024, 9:37 am
वसई : महाविकास आघाडीच्या हातात सत्ता देऊन महाराष्ट्र आणि मुंबईला त्यांचे एटीएम बनवू नका, असे आवाहन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.
वसई विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्नेहा दुबे-पंडित यांच्या प्रचारानिमित्ताने ते शनिवारी (दि. 16) वसईत आले होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर, जनता दलाचे प्रदेश उपाध्यक्ष युरी घोन्सालवीस, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष ईश्वर धुळे, भाजप नेते श्याम पाटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. वसई विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्नेहा दुबे पंडित यांची जाहीर सभा आज वसईत संपन्न झाली. यावेळी गुजराथचे गृहमंत्री हर्ष संघवी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र आता परिस्थिती बदलली आहे, असे त्यांनी हरियाणा विधानसभेतील बहुमताचे उदाहरण देऊन सांगितले. महाराष्ट्राला आपल्याला पुढे न्यायचं असेल तर या ठिकाणी डबल इंजीन सरकारची गरज आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसने गरिबी हटाओची घोषणा केली. पण गरिबी दूर करू शकले नाहीत. मात्र नरेंद्र मोदी यांनी 8 वर्षात 25 कोटी जनतेला द्रारिद्यरेषेच्या वर आणण्याचं काम केलं आहे. आज भारत साधनसंपत्तीच्या बाबतीत भारत जगातील पाच देशांमध्ये आहे.
2017 पर्यंत साधनसंपत्तीत देशात अमेरिका आणि चीन यांच्यानंतर तिसर्या स्थानावर असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्याचा विकास फक्त महायुती करू शकते. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्र काँग्रेस आघाडीच्या हाती देऊन राज्याचं ‘एटीएम’ बनून देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. भाजपचे जाहीरनामे पाहिले तर जे जे आश्वासन दिले ते ते पूर्ण केले असे ते म्हणाले. काश्मिरमधील 370 कलम हटविण्याचे आश्वासन 1951 मध्ये दिले होते ते मोदी सरकारने पूर्ण करून दाखवले असेही ते म्हणाले.
काँग्रेस पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सतत उपेक्षा केली. काँग्रसने मुंबईत बाबासाहेबांचा निवडणुकीत पराभव केला. काँग्रेस 52 वर्ष सत्तेत असूनही डॉ. आंबेडकरांना भारतरत्न देऊ शकली नाही. मात्र नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार दिला असे ते म्हणाले. बाबासाहेब देश आणि विदेशात ज्या ज्या ठिकाणी राहिले त्या सर्व स्थळांचा मोदी सरकारने पंचतीर्थ म्हणून विकास केला असेही ते म्हणाले.
वसईतील आरक्षित जागांवर येथील स्थानिक सत्ताधार्यांनी कब्जा केलेला आहे. त्यावर अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. त्यामुळे सामान्य वसई-विरारकरांना आवश्यक त्या सोयीसुविधा मिळण्यात अडचणी येत आहेत, असे सांगत वसईतील गुंडागर्दी संपवावी, असे आवाहन गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी केले. वसईतील बेकायदा कब्रस्थान या ठिकाणी होऊ देणार नाही. त्याआधी त्यांना माझ्या मृतदेहावरून जावे लागेल, असा इशारा देत डॉ. स्नेहा दुबे-पंडित यांनी दिला.