Published on
:
17 Nov 2024, 6:17 am
Updated on
:
17 Nov 2024, 6:17 am
भाईंदर : काँग्रेसचे माजी नगरसेवक जुबेर इनामदार यांनी त्यांच्या प्रभागातील काही मद्यपी तरुण रस्त्यावरच दुचाकी अवास्तव पार्क करून लोकांना त्रास देत असल्याची तक्रार 2018 मध्ये नयानगर पोलीस ठाण्यात केली होती. त्याचा राग मनात धरून मद्यपी युनेब नासीर केवल (20) व आसीफ अन्वर खान (22) यांनी 3 फेब्रुवारी 2018 रोजी जुबेर यांच्या दोन मुलींना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने घराच्या दरवाजाला आग लावली.
याप्रकरणी नयानगर पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक केली होती. यावर 13 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या अंतिम सुनावणीत न्या. जी. जी. भन्साळी यांनी आरोपींना 10 वर्षांच्या सश्रम करावासासह 3 हजार रुपये आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली. जुबेर इनामदार हे नशामुक्ती संदर्भात नयानगर परीसरातील इ मारतींमध्ये बैठका घेवून जनजागृती करतात. 2018 मध्ये त्यांनी नयानगर परिसरातील अल शम्स मस्जीदच्या मागील रस्त्यावर काही मद्यपी तरुण दुचाकी अवास्तव पार्क करून लोकांना त्रास देत होते. याप्रकरणी जुबेर यांनी परिसरातील रहिवाशांची स्थानिक पोलीसांसोबत बैठक आयोजित करून त्रासदायक ठरणार्या मद्यपी तरुणांविरोधात नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्याचा राग मनात धरून परिसरातच राहणारे मद्यपी युनेब नासीर केवल व आसीफ अन्वर खान यांनी संगनमत करून 3 फेब्रुवारी 2018 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जुबेर घरी नसताना तसेच घरात त्यांच्या मुली या दोघीच असताना त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जुबेर यांच्या घर बाहेरुन बंद करत पेट्रोल दरवाजावर टाकून त्याला आग लावली. घराला आग लागल्याची बाब रुफी व सिदरा यांच्या वेळीच लक्षात आल्याने त्यांनी आरओरड करण्यास सुरुवात केली. यामुळे इमारतीतील शेजार्यांनी धाव घेत जुबेर यांच्या घराच्या दरवाजाला लागलेली आग विझविली. याप्रकरणी रुफी हिने नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. आरोपींना अटक करून 1 मे 2018 रोजी जिल्हा न्यायालयात दोघांवर दोषारोप मादर केले. त्यावरील अंतिम सुनावणी 13 नोव्हेंबर रोजी पार पडली असता न्यायालयाने आरोपींना 10 वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी 3 हजार रुपये आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे.