Published on
:
16 Nov 2024, 10:42 am
Updated on
:
16 Nov 2024, 10:42 am
डोबिवली : डोंबिवली जवळच्या आजदेगावचा सुपुत्र चिन्मय पाटील हा आगरी समाजातील क्रिकेटपटू असून त्याची अरूणाचल प्रदेशाकडून बीसीसी आयडोमेस्टिक सेशन 2024 - 25 रणजी ट्रॉफीसाठी निवड झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाच्या पहिल्या क्रिकेटपटूची रणजीमध्ये निवड झाल्याचे वृत्त डोंबिवलीत येऊन धडकताच चिन्मयचा ग्रामस्थ आणि रहिवाशांनी जोरदार गौरव करण्यात आला.
क्रिकेटपटू चिन्मय याने शुक्रवारी (दि.15) संध्याकाळी आजदेगावातील दत्तमंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी चिन्मयचे गावकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत बँडबाजा वाजवत जंगी स्वागत केले. जे. पी. ग्रुप मित्र मंडळ व गावकऱ्यांनी आजदेगावापासून आजदेपाड्यातील त्याच्या घरापर्यंत मिरवणूक काढली होती. फटाक्यांच्या जोरदार आतिषबाजी करत काढलेल्या चिन्मयच्या मिरवणूकीत गाव आणि आसपासच्या परिसरातील प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते. यावेळी जनार्दन काळण, महेश पाटील, वासुदेव पाटील, आदींनी चिन्मयचे पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले. आजदे पाड्यातील माजी सरपंच जयंता पाटील यांच्या निवासस्थानी क्रिकेटपटू चिन्मयचा सत्कार करण्यात आला. यावेळी गाव आणि पाड्यातील रहिवाशांसह क्रिकेट शौकीन, खेळाडू, क्रिकेटपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाच्या पहिल्या क्रिकेटपटूची चिन्मय पाटील रणजीमध्ये निवड झाल्याने त्याचा सन्मान करण्यात आला. (छाया : बजरंग वाळुंज)
यावेळी क्रिकेटपटू चिन्मय याने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. माझ्या आत्तापर्यंतच्या सर्व यशांमध्ये आई-वडील, गुरू अर्थात शिक्षक-प्रशिक्षक व मित्र-सहकाऱ्यांची साथ लाभली आहे. कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी चिकाटी महत्वाची असते.
ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाच्या पहिल्या क्रिकेटपटूची चिन्मय पाटील रणजीमध्ये निवड झाल्याने त्याचा मान्यवराकडून सन्मान करण्यात आला. (छाया : बजरंग वाळुंज)
प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या आवडीनुसार कोणत्याही खेळात सहभाग घ्यावा. खेळामुळे शारिरिकच नव्हे तर बौद्धिक क्षमतेतही वाढ होत असते. तर चिन्मयचे वडील तथा आजदे गावचे माजी सरपंच जयंता पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खेळाडूंकरिता उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. डोंबिवलीतील सर्व खेळाडूंना या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे चिन्मय रणजी सामन्यापर्यंत पोहोचू शकल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली.
ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाच्या पहिल्या क्रिकेटपटूची चिन्मय पाटील रणजीमध्ये निवड झाल्याने त्याचा मान्यवराकडून गौरव करण्यात आला. (छाया : बजरंग वाळुंज)