आ. महेश बालदी, मनोहर भोईर, प्रितम म्हात्रे तीन उमेदवारांमध्ये प्रमुख लढतpudhari
Published on
:
17 Nov 2024, 6:24 am
Updated on
:
17 Nov 2024, 6:24 am
विधानसभा निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून सर्वच प्रमुख उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. उरण विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहर भोईर आणि प्रितम म्हात्रे या तीन उमेदवारांमध्ये प्रमुख लढत होणार असून ही लढत अतिशय चुरशिची होणार आहे.
या लढतीत कोण बाजी मारणार हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. उरण विधानसभा मतदार संघात एकूण 3 लाख 36 हजार 220 मतदार आहेत. 2019 ला उरण विधानसभा मतदार संघात 2 लाख 90 हजार 519 मतदार होते यावेळेस या मतदार संघात तब्बल 45 हजार 701 मतदार वाढलेले आहेत. त्यामुळे या वाढलेल्या नव मतदारांवर उमेदवारांच्या विजयाची भिस्त आहे.
उरण विधानसभा मतदार संघात नव्याने उदयास येत असलेल्या उलवे नोड, करंजाडे नोड आणि द्रोणागिरी नोड या निम शहरांमध्ये देखिल मतदारांची संख्या लक्षणीय आहे. उलवे नोड मध्ये जवळ जवळ 42 हजार मतदार आहेत. या भागात उंच उंच इमारती असून ही शहरे कॉस्मोपॉलिटीयन होत आहेत. विविध भागातून येथे स्थिर स्थावर झालेले विविध जाती समुहाचे लोक येथे स्थायिक झाले आहेत. त्यामुळे हे मतदार कोणत्या पक्षाला किंवा उमेदवाराला पसंती देतात त्याच्यावर देखिल उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
यापूर्वीच्या निवडणुकीच्या काळात भूमिपुत्र नेहमीच स्थानिक आणि जातीच्या उमेदवारांच्या मागे खंबीरपणे उभा राहिलेला आहे, मात्र त्याचे प्रश्न मात्र आवश्यक त्या गतीने सुटले नाहीत. कॉस्मोपॉलिटीन मतदार आणि न स्थानिकांचे प्रलंबित प्रश्न यामुळे 2019च्या निवडणूकीत येथिल स्थानिकांनी जात पात स्थानिक हे न पहाता महेश बालदी यांना निवडून दिले होते. आत्ता प्रितम म्हात्रे यांच्या उमेदवारीमुळे या मतदार संघात निवडणूक चूरशीची झाली आहे. महेश बालदी प्रितम म्हात्रे आणि मनोहर भोईर हे गावोगावी प्रचार रॅली काढून आपला प्रचार करत आहेत. काही ठिकाणी नेत्यांच्या प्रचाराच्या सभा होत असून कार्यकर्त्यांनी देखिल आपआपले विभाग पिंजून काढले असून मतदारांना वळविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.