विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; पुण्यात उत्सुकता शिगेलाPudhari file photo
Published on
:
23 Nov 2024, 2:22 am
Updated on
:
23 Nov 2024, 2:22 am
Pune Election Results: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवार, दि. 23 रोजी होत आहे. अतिशय चुरशीने आणि ईर्ष्येने झालेल्या या निवडणुकीचा महाफैसला आता काही तासांवर आला आहे. लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्यात अजित पवार, चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अनेक मातब्बरांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी ही निवडणूक असल्याचे मानले जात आहे.
जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणीसाठी 506 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, मतमोजणीसाठी 2 हजार 143 अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील 8 हजार 443 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली असून, मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 पासून सुरू होणार आहे. जिल्ह्यात मतमोजणीच्या सर्वाधिक 30 फेर्या
पुरंदर विधानसभा मतदारसंघात होणार आहेत, तर बारामती मतदारसंघात सर्वाधिक 30 टेबल ठेवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांत मिळून ईव्हीएम मतमोजणीसाठी 391, टपाली मतमोजणीसाठी 87, तर ईटीपीबीएससाठी 28 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.
जुन्नर व आंबेगाव मतदारसंघात मजमोजणीच्या 20, खेड-आळंदीसाठी 20, शिरूरसाठी 24, दौंडसाठी 23, इंदापूरसाठी 24, बारामतीसाठी 20, पुरंदरसाठी 30, भोरसाठी 24, चिंचवडसाठी 24, पिंपरीसाठी 20, मावळसाठी 29, भोसरीसाठी 23, वडगाव शेरीसाठी 22, शिवाजीनगरसाठी 20, कोथरूडसाठी 20, खडकवासलासाठी 25, पर्वतीसाठी 20, हडपसरसाठी 23, पुणे कॅन्टोन्मेंटसाठी 20 आणि कसबा पेठ मतदारसंघासाठी 20 फेर्या होणार आहेत.
जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणीसाठी 528 सूक्ष्म निरीक्षक, 553 मतमोजणी पर्यवेक्षक तसेच 577 मतमोजणी सहायक असे 1 हजार 658 अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय राखीव 458 अधिकारी, कर्मचारी असे एकूण 2 हजार 143 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.निवडणुकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनिक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाणार आहे.
इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्यास सक्त मनाई
मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅल्क्युलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्यास सक्त मनाई आहे. ओळखपत्राशिवाय कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.