Published on
:
18 Nov 2024, 8:16 am
Updated on
:
18 Nov 2024, 8:16 am
ठाणे : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात 18 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 साठी जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघात येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6.00 या वेळेत मतदान होणार आहे. मतदानाचा टक्का वाढीसाठी 18 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक अश्या 18 सखी मतदान केंद्रांची घोषणा करण्यात आली आहे. महिला नियंत्रित मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असणार आहेत.
लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचन बद्धतेचा भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी महिला नियंत्रित महिला मतदान केंद्र असणार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही. तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल.
‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’
‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन नजीकच्या केंद्रांची तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकार्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची निवड करण्यात आली आहे. दरम्यान अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपलेल्या मतदान प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असून जिल्ह्यात सर्व मतदान केेंद्रावर निवडणूक अधिकारी कर्मचारी पोलीस प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. पोलिसांकडूनही कायदा सुव्यस्थेला अडथळा निर्माण होणार नाही यासाठी विशेष मोहीम देखील राबवण्यात येत आहे.