मानोरा (Washim):- तालुक्यात सध्या सोयाबीन(soybeans) काढला असुन मळणीचा खर्च साडेतीन हजार आला आहे, तर सोयाबीनला चार हजार रुपये भाव मिळत आहे. आर्थिक चणचण असलेला गरजू शेतकरी शासनाचे नाफेड हमीभाव खरेदी केंद्रात सोयाबीन विक्रीसाठी घेऊन न जाता बाजारात मिळेल त्या भावाने विक्री करून मोकळा होत आहे.
अनेक शेतकऱ्यांनी फिरवली नाफेड केंद्राकडे पाठ
नांगरणी, वखरणी, बियाणे, खत, पेरणी , निंदन, पाळ्या व फवारणी असा एकंदर खर्चाचे गणित लावले असता शेतकऱ्यांचा अंदर बट्टाचा खेळ होत आहे. या शेतकऱ्यांचा एकंदर बाबीचा विचार केला तर नाफेड केंद्रात नोंदणी केल्यानंतर मोजणीसाठी होत असलेला विलंब व त्यानंतर मोजणी करूनही उशिरा मिळणारी मालाची रक्कम यामुळे अंगावरील कर्ज फेडण्यासाठी मिळेल त्या भावात बाजारात सोयाबीनची विक्री करताना शेतकरी दिसत आहे. यासाठी सोयाबीन खरेदीस हमीभाव आधार भूत केंद्रास मान्यता देवून सोयाबीनचे ४ हजार ८९२ रूपये प्रति क्विंटल हमी भाव देवून सोयाबीन खरेदी केले जाते. मात्र आर्थिक डबघाईत सापडलेला शेतकरी आपल्या अंगावरील पैसे फेडण्यासाठी व्यापाऱ्यांना ३८०० रुपयापासून व ४२०० रुपयापर्यंत सोयाबीनची विक्री करून मोकळा होत आहे.