माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर घणाघाती हल्ला चढवला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपची अक्षरश: लक्तरे काढली. तसेच शिवसेनेच्या नादी न लागण्याचा दमच भाजपला दिला. प्रेमाने मागाल तर आम्ही उचलून देऊ. पण कपटाने वागाल तर उचलून आपटू, असा गंभीर इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आयोजित मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार आसूड ओढले.
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपची अक्षरश: पिसे काढली. आमचं हिंदुत्व राष्ट्रवादी आहे. राष्ट्रीयत्वच हेच हिंदुत्व हाच आमचा बाणा आहे. आमचं हिंदुत्व गोमूत्रधारी नाही. अमित शाह यांनी त्यांच्या हिंदुत्वाची व्याख्या सांगावी, असा थेट सवालच उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केला आहे.
तेव्हा हिंदूत्ववादी
आमच्याशी युती तोडली तेव्हा आम्ही हिंदूत्ववादी नव्हतो? एकनाथ खडसेंनी फोन करून युती तोडल्याचं सांगितलं. कुणाच्या सांगण्यावरून विचारल्यावर उपरवाले के असं ते म्हणाले. प्रबोधनकाराचा नातू आणि बाळासाहेबांचा मुलगा हिंदूत्ववादी नसेल. तो हिंदुत्व सोडू शकेल? मी हिंदू अभिमानी आहे. तसाच मराठीचा कडवट अभिमानी आहे. प्रेमाने वागाल तर उचलून देऊ. कपटाने वागाल तर उचलून आपटू, असा इशारा देतानाच मरायला तुम्ही आणि सर्व काही झाल्यावर श्रेय घ्यायला आम्ही असं करायला आम्ही काही संघ किंवा भाजपवाले नाहीत, असा टोमणाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
लाज असेल तर चालते व्हा
बहुमताचं सरकार आलं कसं? या धक्क्यातून ते अजूनही बाहेर पडले नाहीत. सरकार आलं आणि नंतर पालकमंत्र्यावरून वाद सुरू केला. टायर काय जाळत आहेत. गावाला काय रुसून बसत आहेत. कशाला हवीत ही थेरं. राज्यातील जनतेचे प्रश्न आहेत, ते पाहा ना. लाज असेल तर चालते व्हा. उद्धव ठाकरेंची जागा ठरवताना तुमची जागा काय होती आणि त्यातून तुम्हाला शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला कसं काढलं हे पाहा, असा हल्लाही त्यांनी चढवला.
अंगावर याल तर वळ घेऊन जाल
अमित शाह यांना सांगतो. आमच्या जास्त नादी लागू नका. नाही तर जेवढे अंगावर याल तेवढे वळ घेऊनच दिल्लीला जाल, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. अमित शाह मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ले चढवले. मला अमित शाह यांनी उत्तर दिलं तर मी त्यांचा आणखी समाचार घेत राहणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.