अकोटवासीयांनी आदिशक्तीला दिला निरोप:फलकांद्वारे सामाजिक संदेश, मिरवणूक रथांवर मंडळांनी केली होती आकर्षक रोषणाई

2 hours ago 1
शहरात शुक्रवारी दुर्गा विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. शांततेत पार पडलेल्या या मिरवणुकीत ५९ मंडळांनी या सहभाग नोंदवला. मंडळांनी समाजाला दिशा देणारे पोस्टर्स लावून सामाजिक संदेश दिला. गत नऊ दिवसात शहरात दुर्गा उत्सवादरम्यान कोणताच अनुचित प्रकार घडला नाही. तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल्याने पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. ३ ऑक्टोबरपासून धार्मिक व उत्साहपूर्ण वातावरणात सुरू असलेल्या नवरात्र महोत्सवाची ११ ऑक्टोबर रोजी विसर्जन मिरवणुकीने सांगता झाली. नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांनी धार्मिक तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. काही मंडळांनी गरबा नृत्यांसह विविध स्पर्धाही आयोजित केल्या होत्या. संपूर्ण नवरात्रात शहर भक्तिरसात न्हावून निघाले होते. मिरवणुकीआधी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस निरीक्षक रामनाथ पोकळे यांनी अकोट शहराला भेट देत मिरवणूक मार्गाची पाहणी केली होती. यानंतर अकोट शहर पोलिस ठाण्यात शांतता समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेत मार्गदर्शन केले. शुक्रवारी पार पडलेल्या विसर्जन मिरवणुकीत पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनमोल मित्तल, ठाणेदार अमोल माळवे, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसीलदार सुनील चव्हाण, मुख्याधिकारी डॉ. नरेंद्र बेंबरे, अकोट ग्रामीणचे ठाणेदार किशोर जुनघरे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. दुपारी विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. विसर्जन मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात लावण्यात आला होता. विसर्जन मिरवणुकीत मंडळांनी विविध ठिकाणांवरून बँडपथक, पारंपारीक भजनी मंडळांना आमंत्रित केले होते. गुलालाची व फुलांची उधळण करत वाद्यांच्या तालावर भक्त थिरकत होते. विसर्जन मिरवणूक रथांवर मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई केली. काही मंडळांनी विविध प्रकारचे देखावे सादर केले होते. मिरवणूक मार्गावर महिलांनी रांगोळ्या काढून, दिवे लावून पूजा केली होती. विसर्जन मिरवणुकीत मानाचे मानल्या जाणारे सार्वजनिक नवदुर्गा मंडळ कबुतरी मैदान हे अग्रस्थानी होते. त्या पाठोपाठ शिस्तीत इतरही मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article