अजित पवारांनी आमची बार्गेनिंग पावर संपवली:मुख्यमंत्री पदावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचा आरोप
2 hours ago
1
मुख्यमंत्री पद मिळत नसल्यामुळे शिंदे गटाने अजित पवारांना जबाबदार मानले आहे. अजित पवारांमुळे मुख्यमंत्री पदावर दावा करण्याची आमची बार्गेनिंग पावर कमी झाली, असे वक्तव्य शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, असे आम्हाला वाटते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, असे भाजपच्या लोकांना वाटते. पण अजित पवार शरण गेले असून त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा दिला, त्यामुळे आमची बार्गेनिंग पावर राष्ट्रवादीने संपवली, असा आरोप रामदास कदम यांनी केला. मुख्यमंत्रीपदावरून कुणी, कितीही, काहीही प्रयत्न केले, तरी आमची महायुती अभेद्य राहणार असल्याचेही रामदास कदम म्हणाले. यंदाची विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून लढाई लढली आणि मोठ्या प्रमाणात यश मिळवून दिले. आम्ही एकत्र येऊन महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेऊ. दिल्लीच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे. निवडणुकीपूर्वी अमित शहा म्हणाले होते की, तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. याशिवाय काहीही सांगितले नाही, असेही रामदास कदम म्हणाले. रामदास कदमांचा आरोप मोठा जोक
रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाष्य केले आहे. जर रामदास कदम यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असे वाटत असेल आणि आमच्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली असेल, तर मला वाटते हा निवडणुकीनंतरचा सर्वात मोठा जोक आहे. रामदास कदम फार मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांनी शांत राहावे. उगाच तळपळाट करुन काही भेटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत अभेद्य आणि मजबूत आहे, असेही अमोल मिटकरी म्हणाले. मुख्यमंत्रीपदावरुन शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून तीन दिवस उलटले, तरी महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरत नाहीये. मुख्यमंत्री पदासाठी कोणाची निवड होणार, यावरच चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री करण्याची मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधून होत आहे. तर भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्याने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा, असा सूर भाजप नेत्यांमधून येत आहे. असे असले तरी, तिनही पक्षाचे नेते मिळून जो निर्णय घेतील, तो मान्य असल्याचे सर्वजण सांगत आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)