अदानीने ठाकरे सरकार पाडण्यासाठी पैसे दिले:संजय राऊत यांचा आरोप, देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा
3 hours ago
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी एक आहेत. तसेच अदानी आणि अमित शहा देखील एक आहेत. महाराष्ट्रातील उध्दव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी याच अदानीने पैसे दिले होते. राज्यात भाजपाचे सरकार आणण्यासाठी जो पैसा वापरला गेला तो अदानीचा आहे. त्याची परतफेड म्हणून मुंबईतले सगळे मोक्याचे भूखंड ते अदानीला देण्याचे काम मोदी करत आहेत. मला भीती आहे की, मुंबईतले 105 हुतात्मा स्मारकही हे लोक अदानीच्या घशात घालतील, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी येथे बोलताना केली. कसबा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ लोकमान्य सभागृह याठिकाणी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या प्रसंगी माजी आमदार मोहन जोशी, अंकुश काकडे ,आमदार रवींद्र धंगेकर, रोहित टिळक,गजानन थरकुडे, संजय मोरे, संगीता तिवारी, विशाल धनवडे, गौरव बोराडे उपस्थित होते. संजय राऊत म्हणाले, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. राज्यातील दळभद्री सरकार घालवण्यासाठी पुण्यात आघाडी उमेदवार निवडून आले पाहिजे. कारण राज्यातील आमदार हे 50 कोटी तर खासदार 100 कोटी रुपयांत विकले गेले आहेत. त्यानंतर देखील त्यांचा भ्रष्टाचार सुरू आहे. महाराष्ट्रामधील नेत्यांना गुजरात आपल्या ताटाखालचे मांजर म्हणून वागवतआहेत. त्यांना गुलाम नेते हवे आहेत. राज्यातील उद्योग हे मागील पाच वर्षात गुजरात मध्ये पळवून नेले. आपल्या राज्यातील लाखो रोजगार त्यामुळे गेले आहेत. ही निवडणूक स्वाभिमानाची आहे. ईडी, सीबीआय यांना घाबरून काही नेते भाजपच्या तंबूत गेलेत. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांना न्याय देण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली होती हे लक्षात ठेवण्याची गरज आहे, असे संजय राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले, मोदी राज्यात निवडणूक सुरू असताना ब्राझीलसह पाच देशात फिरण्यास गेले. पण ते सारखे रशियाला का जातात समजत नाही. ते परदेशी नेत्यांशी नेमके काय बोलतात हे ही समजत नाही. अमेरिकेमध्ये ज्याप्रकारे कमला हरली, तसे याठिकाणी निवडणुकीत कमळ हरणार आहे. राज्यात भाजपची गुंडगिरी आम्ही खपवून घेणार नाही. पैशाचा पाऊस येथे चालणार नाही. आपल्या राज्यातील राजकीय परिस्थिती बाबत आता लोकांना चिंता वाटू लागली आहे. महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचा आणि मुंबई राज्यापासून तोडण्याचे भाजपचे षडयंत्र आहे. कारण, मोदी आणि शाह हे राजकारणी नाही तर व्यापारी आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपने फोडले, पण आम्ही स्वाभिमानाने लढत राहिलो आहे. देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. त्यांना माहित झाले आहे की, कुठल्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत. फडवणीसांचे राजकीय अस्तित्व संपत चाललेले आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखे वाटत आहे, असेही संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)