Published on
:
26 Jan 2025, 8:56 am
Updated on
:
26 Jan 2025, 8:56 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतच नव्हे तर जगातील सर्वात मोठा अध्यात्मिक सोहळा म्हणून ओळखला जात असलेल्या प्रयागराज येथील महाकुंभमेळाचा आज (दि.२६) १४वा दिवस आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने महाकुंभात भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे. दरम्यान, पिलीभीत जिल्ह्यातील बरखेडा विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार स्वामी प्रवक्तानंद यांना निर्मल आखाड्याचे महामंडलेश्वर बनवण्यात आले. शुक्रवार, २४ जानेवारी रोजी बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांना किन्नर आखाड्याने महामंडलेश्वर बनवले होते.
कोण आहेत स्वामी प्रवक्तानंद?
महाकुंभमेळा भारतीय जनता पक्षाचे आमदार स्वामी प्रवक्तानंद यांचा महामंडलेश्वर म्हणून अभिषेक झाला. ते २०२२ मध्ये उत्तर प्रदेशमधील पिलीभीत जिल्ह्यातील बरखेडा मतदारसंघातून भाजप आमदार म्हणून निवडून आले आहेत. २१ वर्षांपूर्वीच त्यांनी गृहस्ती जीवनाचा त्यान केला होता. २००३ मध्ये हरिद्वार येथे त्यांचे गुरु स्वामी अलखानंद यांच्याकडून दीक्षा घेऊन त्यांनी संत परंपरेत प्रवेश केला. तेव्हापासून ते समाजसेवा आणि अध्यात्मात सक्रिय आहेत. ते प्रकटानंद हे खमारिया येथील आक्रिया धामचे प्रमुख आहेत प्रयागराज विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर स्वामी प्रकाशानंद यांनी राजकारणात प्रवेश केला. २००९ मध्ये भाजपमध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी पक्षाच्या पांचाळ ब्रज प्रदेशाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. २०२२ च्या पिलीभीत जिल्ह्यातील बरखेडा विधानसभा मतदारसंघात त्यानी सपा उमेदवाराचा ८१,००० मतांनी पराभव केला होता.
प्रयागराजमध्ये भाविकांची अलाेट गर्दी
आज प्रयागराजमधील संगम येथे भाविकांना स्नान करण्यासाठी दोन तास वाट पहावी लागत असल्याचे चित्र आहे. सकाळी १० वाजेपर्यंत ३७ लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र स्नानासाठी हजेरी लावली. संगम परिसरात सुमारे २०-२५ लाख लोक राहत असल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.पोलिस भाविकांना अन्य घाटांवरही स्नान करण्याचे आवाहन सतत करत आहेत. रविवारच्या सुटीमुळे प्रयागराजमध्ये बाहेरून येणाऱ्या सर्व वाहनांना संगमच्या १०-१२ किमी लांब रांगा लागल्या आहेत. तिथून लोक ई-रिक्षा आणि शटल बसने येत आहेत; पण ही वाहने तिथे पोहोचण्यापूर्वी ५-६ किमी अंतरावर थांबत आहेत. येथून पुढे भाविक पायी चालत संगंम क्षेत्रावर पाेहचत आहेत.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरक्षा व्यवस्थेत वाढ
प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांनीही सुरक्षा वाढवली. विविध ठिकाणी तपासणी केली जात आहे. यामुळे महाकुंभातील सर्व प्रवेश मार्ग ठप्प झाले आहेत. प्रयागराज जंक्शन ते संगम पर्यंतच्या गाड्या बंद आहेत. यामुळे रेल्वे स्थानकावर पोहोचणाऱ्या लोकांना १०-१२ किमी चालत जावे लागते. अखिलेश यादव आज महाकुंभात स्नानासाठी येणार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांचा सोमवार, २७ जानेवारी रोजी कार्यक्रम आहे. ते प्रयागराजमध्ये ५ तास थांबणार आहेत. प्रयागराजमध्ये ५ तास राहणार आहे.