Published on
:
05 Feb 2025, 9:36 am
Updated on
:
05 Feb 2025, 9:36 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्माने धावांचा पाऊस पाडला. त्या विक्रमी खेळीचा भारतीय फलंदाजाला चांगलाच फायदा झाला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन टी-20 क्रमवारीत अभिषेक शर्माने मोठी झेप घेतली आहे. तो अव्वल स्थानाच्या अगदी जवळ पोहचला आहे. त्यामुळे ट्रॅव्हिस हेडचे स्थाचे स्थान धोक्यात आले आहे. (Abhishek Sharma ICC T20 Rankings)
भारताने इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका 4-1 ने जिंकली. त्यानंतर बुधवारी (5 फेब्रुवारी) आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली. टी-20 मध्ये भारतीय फलंदाजांचे वर्चस्व दिसत आहे. यादीतील टॉप 5 मध्ये 3 भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. यात अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे.
अभिषेकची 38 स्थानांची झेप
आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन टी-20 क्रमवारीत अभिषेक शर्माने मोठी झेप घेतली. तो 38 स्थानांनी पुढे सरकून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे हे आतापर्यंतचे सर्वोच्च रँकिंग आहे. खरं तर, तो पहिल्यांदाच टॉप 10 मध्ये आला असून त्याने 829 रेटिंगसह थेट दुसरे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेड (855 रेटिंग) अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे. अभिषेक पुढे आल्याने इतर सर्व फलंदाजांची एक-एक स्थानाने घसरण झाली आहे.
अभिषेक खालोखाल तिस-या स्थानी भारताचा तिलक वर्मा (803) आहे. त्यानंतर इंग्लंडचा फिल साल्ट (798) चौथ्या आणि भारताचा सूर्यकुमार यादव (738) पाचव्या स्थानी आहेत. यानंतर इंग्लंडचा जोस बटलर (729) सहाव्या, पाकिस्तानचा बाबर आझम (712) सातव्या, श्रीलंकेचा पथुम निस्सांका (707) आठव्या, पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान (704) नवव्या आणि श्रीलंकेचा कुसल परेरा (675) दहाव्या स्थानी आहेत.