अमरावतीच्या कॉंग्रेस आमदारावर निलंबनाची कारवाई:सुलभा खोडके आता अजित पवारांच्या पक्षात जाणार?

2 hours ago 2
अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या कॉंग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांचे निलंबन करण्यात आले आहे. विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. कॉंग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशावरून कॉंग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुलभा खोडके यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान, सुलभा खोडके या अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याच्या देखील तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांनी अमरावती विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या सुनील देशमुख यांना हरवून विधानसभेत प्रवेश केला होता. महाविकास आघाडी सत्तेत असताना त्यांनी सरकारच्या माध्यमातून मतदारसंघातील कामे करवून घेतली. त्यानंतर सत्तेत महायुतीचे सरकार आल्यावर विशेषतः अजित पवार महायुतीमध्ये सामील झाल्यावर मतदारसंघातील कामांसाठी सुलभा खोडके यांनी निधी मिळवला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जवळीक वाढल्याने विधान परिषद निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेस उमेदवाराला मतदान केले नसल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सुलभा खोडके यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत असे क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप असताना आणखी 5 आमदारांनी खोडके यांच्यासह पक्षविरोधी कारवाया केल्याचे सांगितले जाते. या घटना उघडकीस आल्यावर काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी नाना पटोले यांना सांगून सुलभा खोडके यांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्याचे निर्देश देत कारवाई केली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांमध्येच सुलभा खोडके या अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांचा अमरावती येथे मोठी सभा घेत व शक्तिप्रदर्शन करत सुलभा खोडके यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात पक्षप्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. 2019 साली देखील सुलभा खोडके यांच्याकडे दोन पर्याय होते, कॉंग्रेसकडून निवडणूक लढावी की राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून, मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी असल्याने अमरावतीची जागा कॉंग्रेसला मिळाली आणि सुलभा खोडके यांनी कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली व भाजपच्या सुनील देशमुख यांचा पराभव केला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article