Published on
:
07 Feb 2025, 1:54 am
Updated on
:
07 Feb 2025, 1:54 am
वॉशिंग्टन : अमेरिकेतून भारतात रवानगी करण्यात आलेल्या 104 भारतीयांचा प्रवासादरम्यान छळ करण्यात आल्याचे समोर आले आहे. अमेरिकेत बेकायदा आश्रय घेतलेल्या भारतीयांची पहिली तुकडी अमेरिकेतून पाठविण्यात आली. भारतीयांच्या हाता-पायात बेड्या घालून त्यांना फरफटत नेल्याचे व्हिडीओतून पुढे आले आहे. त्यांना 40 तास शौच करण्यासही मज्जाव करण्यात आला होता. पुन्हा बेकायदा प्रवेश केल्यास अमानवीय पद्धतीने हकालपट्टी करण्यात येईल, अशी धमकीही अमेरिकन सैनिकांनी भारतीयांना दिली.
डंकी रूटचा अवलंब करून गुन्हेगारी स्वरूपाचे लोक ब्रिटन, कॅनडा अथवा अमेरिकेत आश्रय घेतात. अनेक देशांचा प्रवास करून ईप्सित ठिकाणी डंकी रूटद्वारे पोहोचवले जाते. या प्रवासात जीविताला धोका असतो. कारण, प्रत्येक देशाच्या सीमेवर सैनिक तैनात असतात. सैनिकांना संशयित घुसखोर आढळून आल्यास ते त्वरित गोळी घालतात. याशिवाय रक्त गोठविणारी थंडी आणि भुकेनेही डंकी रूटमध्ये मृत्यू होण्याची भीती असते.
पंजाबचे जयपाल सिंह यांनी सांगितलेली डंकी रूटची कहानी अंगावर शहारे आणणारी आहे. 18 पर्वत पार करून अमेरिकेत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. 24 जानेवारी रोजी सिंह यांनी डंकी रूटद्वारे अमेरिकेत प्रवेश केला होता. ट्रॅव्हल एजंटने फसविल्यामुळे त्यांना त्याच दिवशी अटक करण्यात आली होती. 18 पर्वत पार करावे लागले. समुद्रात बोटीतून जाताना बोट बुडत होती. सुदैवाने आम्ही बचावलो; मात्र अन्य बोटीतील एकाचा बुडून मृत्यू झाला. पनामातील जंगलातही एकाचा मृत्यू झाला. पहिल्यांदा इटली आणि तेथून दक्षिण अमेरिकेत नेण्यात आले. डंकी रूटमध्ये 15 तासांचा पायी 45 कि.मी. प्रवास करावा लागला. जंगल आणि सीमांवर अनेक ठिकाणी मृतदेह आढळल्याचेही सिंह यांनी सांगितले.
व्हिसाशिवाय विदेशात आश्रय घेण्यासाठी नामचीन गुंड अथवा देशातून फरार घोषित करण्यात आलेले गुन्हेगार डंकी रूटचा वापर करतात. आंतरराष्ष्ट्रीय स्तरावर डंकी रूटसाठी रॅकेट कार्यरत आहे. ईप्सित ठिकाणी संबंधितास नेण्यासाठी दलाल 40 लाखांपर्यंत पैसे घेतात. कॅनडा आणि मेक्सिको सीमेवर दलालांचे रॅकेट असते. दलाल या देशांच्या सीमेवरून डंकी रूटद्वारे अमेरिकेत नेतात.
लाख भारतीयांची घरवापसी होणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत बेकायदा स्थलांतर केलेल्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. अमेरिकेत 7 लाख 25 हजार भारतीयांनी बेकायदा आश्रय घेतला असून या सर्वांना भारतात पाठविणार असल्याचे ट्रम्प प्रशासनाने जाहीर केले.
पोलिसांचे येणे-जाणे नसणार्या ठिकाणी घुसखोर आश्रय घेतात. त्यानंतर कागदपत्रांची आवश्यकता नसणार्या ठिकाणी ते नोकरी करतात. पोलिसांना सापडल्यास त्यांना अटक केली जाते. त्यानंतर त्यांची संबंधित देशात डिपोर्टेशनद्वारे रवानगी केली जाते.