जगात असंख्य गावं आहेत. अनेक गावं कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्ध आहेत. या गावातील प्रथा, परंपरा यामुळे ही गावं अधिक प्रसिद्ध आहेत. काही चांगल्या आहेत. काही प्राचीन काळापासूनच्या आहेत. तर काही विचित्र परंपरा आहेत. ब्रिटनमधील हर्टफोर्डशायरमधील एक स्पीलप्लाट्ज नावाचं गाव आहे. हे गाव सध्या चर्चेत आहे, ते गावातील अनोख्या परंपरेमुळे. या गावातील लोक गेल्या 90 वर्षापासून एका अनोख्या परंपरेचं पालन करत आहेत. ती म्हणजे, या गावातील लोक कपडेच परिधान करत नाहीत. तुम्हालाही वाचून धक्का बसला असेल ना? पण हे गावच न्यारं आहे, त्याला करणार तरी काय?
स्पीलप्लाट्स गावातील ही परंपरा नेचरिझ्मवर आधारीत आहे. कपड्यांशिवाय राहणं हे स्वाभाविक जीवनाचं प्रतिक आहे. यामुळे शरीर समाजाद्वारे लावण्यात आलेल्या बंधनातून मुक्त होतं, असं या गावातील लोकांचं म्हणणं आहे. ही परंपरा 90 वर्षापूर्वी म्हणजे 1929पासून सुरू झाली. ही परंपरा आजही तशीच सुरू आहे.
गावाचा इतिहास आणि परंपरा
या गावाचा शोध 1929मध्ये इसुल्ट रिचर्डसन नावाच्या व्यक्तीने लावला. त्यांना ही जागा इतकी आवडली की त्यांनी या गावातच मुक्काम ठोकण्याचा निर्णय घेतला. या गावात एक पब, स्विमिंग पूल आणि क्लब आहे. या गावातील सर्व लोक शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. असं असूनही या गावातील लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पुरुष कपड्यांशिवाय आरामात राहतात.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गावातील लोक जेव्हा शहरात जातात तेव्हा ते कपडे घालून जातात. पण गावात आल्यावर लगेच कपडे काढून राहू लागतात. मात्र, थंडीच्या वेळी किंवा एखाद्या विशेष प्रसंगी हे लोक कपडे परिधान करतात. या गावातील लोक कपड्यांशिवाय राहण्याच्या जीवनशैलीशी समरस झाले आहेत. तसेच आपण कपड्यांशिवाय राहतो याचं त्यांना जराही दु:खं नाहीये.
पर्यटकांसाठी नियम
गावात येणाऱ्या पर्यटकांना किंवा पाहुण्यांना नेचरिझ्मच्या नियमांचं पालन करावं लागतं.
प्रत्येकासाठी ही परंपरा योग्य आहे का?
स्पीलप्लाट्ज गावातील ही परंपरा सर्वांसाठी नाही. पण या परंपरेतून शारीरिक आणि मानसिक स्वातंत्र्यांची ऊब मिळते, असं या गावातील लोकांचं म्हणणं आहे. कपड्यांशिवाय राहण्याचा अनुभव त्यांना समाजाने बनवलेल्या स्टिरियोटाइप्समधून मुक्त करतो.
जगभरातून लोक येतात
स्पीलप्लाट्ज गाव हे फक्त एक गाव नाहीये. तर जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. जगभरातील लोक या गावात येतात. इथली अनोखी जीवनशैली समजून घेण्याचा प्रयत्न करतात.