अहमदपुरातील तरुणांकडून दररोज 50 किमी सायकलिंग:तरुणांसोबत राहिल्यामुळे मन आणि आरोग्य तंदुरुस्त

2 hours ago 1
अहमदपूर मधील तरुणांमध्ये सध्या हेल्थ अवेअरनेस वाढत असून शहरांमध्ये योगा ग्रुप , रनर्स ग्रुप व सायकलिंग ग्रुप यांच्या माध्यमातून तरुण आपल्या शारीरिक फिटनेस कडे लक्ष देताना दिसत आहेत. अहमदपूर शहरात जवळपास ८० जणांचा सायकलस्वारांचा ग्रुप गेले दोन वर्षे कार्यरत असून या ग्रुपमधील सदस्य दररोज ५० किलोमीटर सायकलिंग करतात. ग्रुपच्या प्रत्येक सदस्याच्या वाढदिवसाच्या दिवशी शंभर किलोमीटर सायकलिंग करून त्या सदस्याचा वाढदिवस साजरा केला जातो. ग्रुपमध्ये दीपक वलसे, नामदेव बरुरे,कृष्णा काळे, हरिदास तमेवार, अभिलाष पोकर्णा,कपिल बिरादार, संतोष पाटील,आशिष हेंगणे, अजब सिंग,सचिन करकनाळे, भरती ईगे, धनंजय टोकले यांच्यासह अनेक तरुण सहभागी आहेत. आपल्या सदस्याच्या वाढदिवसा दिवशी रात्री अडीच वाजता हे सर्व सदस्य सायकलिंगला सुरुवात करतात. सकाळपर्यंत शंभर किलोमीटर सायकलिंग पूर्ण करतात. सध्या अहमदपूर मध्ये सायकलिंग चांगलेच लोकप्रिय होताना दिसत असून दोन सदस्यांपासून सुरू झालेला हा ग्रुप आता जवळपास ८० सदस्यांचा आहे. ग्रुपचे सदस्य हरिदास तम्मेवार यांचा ६७ वा वाढदिवस सर्व सदस्यांनी १०२ किलोमीटर सायकलिंग करून साजरा केला. सायकलिंग ग्रुप मध्ये शहरातील शासकीय अधिकारी,व्यापारी, शिक्षक, विद्यार्थी यांचा समावेश आहे. सायकलिंगमुळे शारीरिक फिटनेस चांगले राहते. या ग्रुपमधील काही सदस्यांची शुगर सुद्धा नियंत्रित होऊन त्यांची औषधे बंद झाली आहेत. सायकलिंग करताना सुरक्षिततेसाठी काही काळजी निश्चित घ्यावी लागते. हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. विशिष्ट दर्जाची सायकलही यासाठी लागते. अहमदपूर शहर हे शैक्षणिक पॅटर्नसाठी प्रसिद्ध आहे मात्र सध्या आरोग्याचा पॅटर्न सुद्धा चांगलाच बहरताना दिसत आहे. सकाळच्या वेळी शहरातील रस्त्यावर व्यायाम,योगा,रनिंग,वॉकिंग सायकलिंग यासाठी शेकडो तरुण बाहेर पडलेले दिसतात. अहमदपूर येथील सायकलस्वारांच्या ग्रुपमधील सदस्य. ^मी सेवानिवृत्त झाल्यानंतर फिटनेस साठी सायकलिंगकडे वळलो. मी दररोज ५० किलोमीटर सायकलिंग करतो. आज वयाच्या ६७ व्या वर्षी सुद्धा मला कुठल्याच प्रकारची व्याधी नाही व सायकलिंगच्या या ग्रुपमधील तरुणांसोबत राहिल्यामुळे मन, आरोग्य तंदुरुस्त राहते. -हरिदास तम्मेवार, सायकलपटू, अहमदपूर.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article