त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, मला सांगा तुमचं काय गेलं ? कविवर्य मंगेश पाडगांवकर यांची ही कविता खूप प्रसिद्ध आहे. पण आपल्याकडे प्रेमाबद्दल अजूनही थोडी अढी असल्याचं दिसतंच. मुलाने-किंवा मुलीने प्रेमविवाह केला किंवा आंतरधर्मीय लग्न केलं, तर लगेच सगळ्यांच्या भुवया उंचावतात. खोट्या प्रतिष्ठेपायी आईवडील आपल्या पोटच्याच मुलांशी प्रसंगी कसंही वागू शकतात. अशीच एक धक्कादायक घटना जालन्यामध्ये घडली आहे.आंतरधर्मीय विवाह केला म्हणून आई-वडिलांनी त्यांच्याच पोटच्या मुलीला आणि 3 वर्षांच्या चिमुकल्या नातवाला तब्बल 2 महिने साखळदंडाने बांधून डांबून ठेवलं होतं. अखेर भोकरदन पोलिसांनी त्या विवाहितेची सुटका केल्यानंतर तिने सुटकेचा नि:श्वास सोडला. भोकरदन शहराजवळील एका गावातील ही खळबळजनक घटना आहे. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार भोकरदन पोलिसांनी विवाहितेची सुटका करून तिला पतीच्या ताब्यात दिले.
आंतरधर्मीय विवाह केला म्हणून डांबून ठेवलेल्या विवाहिता व 3 वर्षाच्या मुलाची सुटका भोकरदन पोलिसांनी सुटका केलीय.भोकरदन शहराजवळील एका गावातील ही धक्कादायक घटना आहे.मुलीने आंतरधर्मीय विवाह केल्याचा राग मनात धरून तिच्या आई-वडिलांनी तिला व तिच्या 3 वर्षाच्या मुलाला साखळ दंड पायाला बांधूनन तब्बल 2 महिने डांबून ठेवलं होतं. त्यानंतर पीडित विवाहितेच्या पतीने न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाच्या आदेशानुसार भोकरदन पोलिसांनी विवाहितेची सुटका केली. त्यानंतर तिला छत्रपती संभाजीनगर मध्ये तिच्या पतीच्या ताब्यात दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, भोकरदन शहरालगत असलेल्या आलापुर येथील खालिद शहा सिकंदर शहा यांची मुलगी शहनाज उर्फ सोनल ही छत्रपती संभाजीनगर येथे कुटुंबासोबत राहत होती. मिसाळवाडीमध्ये राहत असताना तेथील सागर संजय ढगे या मुलासोबत तिने आंतरधर्मीय विवाह केला. त्यांना एक तीन वर्षांचा मुलगाही आहे. त्यानंतर शहा कुटुंब मूळ गावी आलं. दोन महिन्यांपूर्वी शहनाच्या बहिणीची प्रसूती झाली, त्यावेळी तिच्या आईने बाळाला पाहण्यासाठी शहनाद उर्फ सोनल आणि पतीला आलापूरच्या घरी बोलावलं. मात्र घरी आल्यावर आई-वडिलांनी मुलगी आणि नातवाला घरात ठेवून घेतलं आणि जावयाला हाकलून दिलं.
थोडे दिवसांनी जावई पुन्हा पत्नीला घ्यायला आला असता शहनाजच्या आई-वडिलांनी त्याचा अपमान करून पुन्हा हाकललं. मुलगी पळून जाऊ नये म्हणून त्यांनी मुलीच्या आणि नातवाच्या पायाला साखळदंड बाधून घरात डांबून ठेवलं. शहनाज उर्फ सोनलच्या बहिणीने या घटनेची माहिती सोनलच्या नवऱ्याला दिली. त्यामुळे सागरने अखेर उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेऊन त्याच्या पत्नीची व मुलाची सुटका करण्याची विनंती केली. त्यामुळे उच्च न्यायालयाने भोकरदन पोलिसांना त्या तरूणीची व मुलाची सुटका करण्याचे आदेश दिले. त्यानुसार भोकरदन पोलिसांनी कारवाई करत त्यांची सुटका केली व त्या दोघांना पतीकडे सुखरूपपणे पोहोचवलं.