शंभर दिवसांचे उद्दीष्ट साठ दिवसांत पूर्ण
मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेअंतर्गत नाशिक परिमंडळात 22 हजार 509 सौर पंप कार्यान्वित झाले आहेत.Pudhari News Network
Published on
:
05 Feb 2025, 4:06 am
Updated on
:
05 Feb 2025, 4:06 am
नाशिक : मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेअंतर्गत महावितरणने 100 दिवसांत 52 हजार 705 सौर पंप बसविण्याचे ठेवलेले उद्दीष्ट अवघ्या 60 दिवसांतच पूर्ण करत एकूण 53 हजार 9 सौर पंप बसविले आहेत. यापैकी नाशिक परिमंडळात 22 हजार 509 सौर पंप कार्यान्वित झाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर 2024 रोजी शपथ घेतल्यानंतर शंभर दिवसांसाठी विविध विभागांसाठी उद्दिष्टे निश्चित केली. महावितरणने मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत दीड लाख पंप बसविण्याचे लक्ष्य ठेवले होते. 6 डिसेंबरपर्यंत 97 हजार 295 पंप बसविले गेले, तर 4 फेब्रुवारीपर्यंत आणखी 53 हजार 9 पंप बसवून एकूण संख्या 1 लाख 50 हजार 304 वर पोहोचली. नाशिक परिमंडळात 22,509 पंप बसविण्यात आले. महावितरणचे लक्ष्य 52,705 पंप बसविण्याचे होते, मात्र अवघ्या साठ दिवसांत 53,009 पंप बसविण्यात यश मिळवले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
राज्यात 4 फेब्रुवारी अखेर बसविलेल्या 1,50,304 सौर कृषी पंपांमध्ये जालना (18,494 पंप), बीड (17,944), अहिल्यानगर (13,366), परभणी (11,755), संभाजीनगर (9,329), नाशिक (9,143), हिंगोली (8,538), धाराशीव (6,765 ) आणि जळगाव (6,648) या जिल्ह्यांनी आघाडी घेतली आहे.
मागेल त्याला सौर कृषी पंप या राज्य शासनाच्या योजनेत केंद्र सरकारकडून 30 टक्के आणि राज्याकडून 60 टक्के अनुदान मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर ऊर्जा निर्मिती करण्याचे सौर पॅनेल्स, कृषी पंप असा संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा 5 टक्के असून त्यांना 95 टक्के अनुदान मिळते.
25 वर्षे अखंडीत वीजपुरवठा
सौर कृषीपंप बसविल्यावर शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध होत असल्याने त्यांची अनेक दशकांची मागणी पूर्ण होते. हे पंप वीज वितरणावर अवलंबून नसल्याने शेतकरी दिवसा हव्या त्या वेळेला सिंचन करू शकतो. सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्समधून 25 वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ कृषी पंपासाठी वीजबिलातून मुक्तता होते. सौर ऊर्जेचा वापर केल्यामुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते.
देशभरात महाराष्ट्र अग्रेसर
सौर कृषीपंप बसविण्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याने देशात आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षभरात या मोहिमेला विशेष गती आली आहे. राज्यात 2015 पासून नऊ वर्षात महावितरणने 1 लाख 6 हजार 616 सौर कृषी पंप विविध योजनांच्या अंतर्गत बसविले होते. तथापि, जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत दीड लाख पंप बसविले आहेत.