कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात व्हाईट आर्मीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात खा. शरद पवार यांना आपत्ती व्यवस्थापन महायोद्धा पुरस्कार प्रदान करताना खा. शाहू महाराज, अशोक रोकडे. सोबत कुलगुरू डॉॅ. डी. टी. शिर्के. जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, समरजित घाटगे, व्ही. बी. पाटील, डॉ. व्ही. एन. शिंदे आदी. (छाया : मिलन मकानदार)
Published on
:
24 Jan 2025, 1:12 am
Updated on
:
24 Jan 2025, 1:12 am
कोल्हापूर : आपत्तीच्या काळात महाराष्ट्रातील शासकीय यंत्रणा, अधिकारी व स्वयंसेवी संस्था उत्कृष्ट काम करतात. याचा अनुभव प्रत्येक संकटाच्या वेळी आला आहे. त्यामुळे अशा काळात काम करणार्या शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, अधिकारी यांना नागरिकांनी पाठबळ दिले, तर कोणत्याही संकटांवर मात करू शकतो, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खा. शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केला.
व्हाईट आर्मी, शिवाजी विद्यापीठ शिव-सहाय्यता आपत्ती व्यवस्थापन केंद्र, एनएसएस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आपत्ती व्यवस्थापन महायोद्धा पुरस्कार सोहळा विद्यापीठातील राजमाता जिजाऊ माँसाहेब सभागृहात गुरुवारी सायंकाळी झाला. याप्रसंगी खा. शरद पवार यांना आपत्ती व्यवस्थापन महायोद्धा पुरस्कार खा. शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, जिल्हाधिकारी अमोल येडगे, समरजित घाटगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खा. पवार यांनी लातूर, भूज, कच्छमधील भूकंप, मुंबईचा बॉम्बस्फोटावेळी शासकीय यंत्रणा व इतर गोष्टी हाताळताना आलेले अनुभव कथन केले. देशामध्ये अनेक प्रकारची संकटे येतात. महाराष्ट्रात काम करताना अनेक आपत्तींचा सामना करावा लागला आहे. लातूरच्या भूकंपात सकाळी पोहोचलो तेव्हा अनेक घरे पडली होती, जनजीवन विस्कळीत झाले होते. अशा परिस्थितीत मी सोलापूरला माझे कार्यालय थाटून प्रशासकीय यंत्रणेशी संवाद साधत तेथील परिस्थिती हाताळली. भूकंपावेळी शासकीय अधिकार्यांनी, काही स्वयंसेवी संस्थांनी उत्कृष्ट काम केले. आपत्तीच्या काळात महाराष्ट्रातील शासकीय यंत्रणा चांगले काम करते, असा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
खा. शाहू महाराज म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन योद्धा पुरस्काराने खा. शरद पवार यांचा सन्मान योग्य व्यक्तीचा सन्मान आहे. लातूर येथील भूकंपाच्यावेळी ते पोहोचले. त्यांनी गतिमान पद्धतीने शासकीय यंत्रणा कार्यरत केली. यामुळेच लोकांना योग्यवेळी मदत पोहोचली, अनेकांचे जीव वाचले. भूज येथील भूकंपावेळी यशस्वीपणे त्यांनी महाराष्ट्र पॅटर्न वापरून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. मुंबई बॉम्बस्फोटात खा. पवार धावून गेल्याने वातावरण शांत झाल्याचे गौरवोद्गार खा. शाहू महाराज यांनी काढले. व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या 25 वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेतला. शालेय अभ्यासक्रमात आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रमाचा समावेश करावा. तसेच कोल्हापुरात आपत्ती व्यवस्थापनसंदर्भातील विद्यापीठ व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन व मानपत्राचे वाचन केले. अमोल कोडोलीकर यांनी आभार मानले. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, सरोजमाई पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, रयत शिक्षण संस्था मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य डॉ. एम. बी. शेख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आर. के. पोवार, अनिल घाटगे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
दै. ‘पुढारी’ रिलीफ फंडच्या कार्याचा गौरव
दै. ‘पुढारी’ने देश, राज्य आणि विविध जिल्ह्यांत आलेल्या आपत्तीच्या वेळी महत्त्वाची भूमिका बजावली. लातूर, गुजरातमधील भूज, कच्छचा भूकंप यासह कोल्हापूर, सांगली, सातारा येथील महापुरात लोकांना जीवनावश्यक साहित्यासह विविध गोष्टींची मदत केली. अनेकांचे संसार नव्याने उभारले. आपत्ती व्यवस्थापनातील याच कार्याची दखल घेऊन व्हाईट आर्मीच्या वतीने दै. ‘पुढारी’ रिलीफ फंड कार्याला आपत्ती व्यवस्थापन योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले.