शरद पवारांच्या शेजारी बसणे अजित पवारांनी टाळलेPudhari
Published on
:
24 Jan 2025, 4:58 am
Updated on
:
24 Jan 2025, 4:58 am
पुणे: मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) 48 व्या वार्षिक सभेच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे नेते दीड वर्षानंतर येथे एकत्र आले. मात्र, सभेच्या व्यासपीठावर शेजारी-शेजारी बसण्याची लावलेली नावाची पाटी बदलून सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना त्यांनी मध्यभागी बसविले. त्यामुळे काका-पुतण्यांना शेजारी-शेजारी बसण्याचा योग अजित पवार यांनी टाळल्याचे दिसून आले.
संचालक मंडळाच्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्यात व्हीएसआयच्या विविध विकासकामांवरील संभाषण पूर्वीप्रमाणे राहिल्याचे बैठकीनंतर समजले. त्यामुळे राष्ट्रवादी कँा ग्रेसच्या दुभंगलेल्या स्थितीनंतर या दोन नेत्यांमधील दुरावा व्हीएसआयच्या बैठकीत आणि सभेत काहीसा कमी झाल्याची चर्चा कार्यक्रमानंतर सुरू झाली होती.
व्हीएसआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि त्याचेवळी उल्लेखनीय काम करणार्या साखर कारखान्यांना पुरस्कार देऊन करण्यात येणार्या या कार्यक्रमात व्हीएसआयचे विश्वस्त आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यानुसार दोन्ही पवार यांची बैठक व्यवस्था व्यासपीठावर शेजारी-शेजारी करण्यात आली होती.
मात्र, सभा सुरू होण्यापूर्वी अगोदर अजित पवार हे व्यासपीठावर आले आणि त्यांच्या शेजारी-शेजारी बैठक व्यवस्था आणि नावाची पाटील असल्याचे लक्षात येताच त्यांनी ती व्यवस्था बदलली. त्यामुळे अजित पवार यांनी शरद पवार यांच्या शेजारी बसण्याचे टाळले.
एवढेच नाही, तर बाबासाहेब पाटील हे भाषणाला उभे राहिल्यानंतर त्यांच्या खुर्चीवर अजित पवार यांच्या नावाचा फलक दिसला. ही गोष्ट अजित पवार यांच्या नजरेस आली. संस्थेचे महासंचालक संभाजी कडू पाटील यांना त्यांनी काही बोलण्यासाठी बोलून घेतले आणि तो फलकही त्यांनी स्वतःच्या हाताने खुर्चीच्या मागे ठेवला.
सभेनंतर अजित पवार यांना विविध विषयांवर पत्रकारांनी छेडले. त्या वेळी शेजारी-शेजारी बसणे टाळल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील हे प्रथमच सहकारमंत्री झाले असून, त्यांना शरद पवार यांच्याशी बोलायचे होते. म्हणून त्यांना शेजारची खुर्ची दिली. माझा आवाज हा दोन-तीन खुर्च्या ओलांडून दूर जाऊ शकतो. म्हणून मी दूर बसलो. व्हीएसआयच्या गेल्या दोन वर्षांतील बैठकांना येण्याचे टाळले असल्याबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले, तेव्हा मी फार कामात होतो. माझे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील याचा विचार करत होतो, असे ते मिश्किलपणे म्हणाले.
शरद पवार यांच्या केबिनमध्येही चर्चा
उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी लवकर व्हीएसआयमध्ये आले. ते थेट संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या केबिनमध्ये गेले. सुमारे अर्धा तास ते केबिनमध्येच होते. या वेळी त्यांच्या गटाचे नेते आमदार दिलीप वळसे पाटीलही तेथे उपस्थित असल्याचे समजले.
त्यांच्यात नेमकी कोणती चर्चा झाली, याबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले, साखर उद्योग, इथेनॉल, साखर कारखानदारीचे प्रश्न यांच्यासह राज्य सरकारशी संबंधित ऊर्जा, कृषी, उत्पादन शुल्क आणि सहकार या खात्याशी संबंधित प्रश्न सोडविण्यावर चर्चा झाली. तसेच व्हीएसआय संस्थेची विस्तार वाढ, नवे प्रकल्पांवर चर्चा झाल्याचे ते म्हणाले.
सर्वपक्षीय नेत्यांच्या हजेरीने साखर पेरणीचे चित्र
व्हीएसआयच्या वार्षिक सभेच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षासह दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाल्याने साखर उद्योगाप्रमाणेच जणू ही साखर पेरणी सुरू असल्याचे चित्र दिसू लागले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाने चांगलाच धुरळा उडाला होता.
निवडणुकानंतर झालेली व्हीएसआयच्या वार्षिक सभेत निवडणुकांचा कोणताच परिणाम दिसू न देता मुक्तपणे ही नेतेमंडळी आपापसात चर्चा करीत हास्य-विनोदात रंगलेली दिसली. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील व हर्षवर्धन पाटील हास्यविनोदात रंगले होते.
भाजपचे नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंह राजेभोसले हेसुध्दा व्यासपीठावर उपस्थित होते. तर दुसरीकडे स्वतः शरद पवार आणि अजित पवार गटाचे नेते व व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील शेजारी बसून संवाद साधत होते. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम हेसुद्धा उपस्थित होते.
लाडक्या बहिणींचा पैसा रिकव्हर करण्याचा विचार नाही
लाडकी बहीण योजनेचा फायदा बांगलादेशींनी घेतल्याचे समोर आल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, आता कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. आधारकार्ड लिंक करायची होती. पण, वेळ कमी होता. आधारकार्ड लिंक केले जाईल. मुंबई, पुणे, कोलकाता अशा मोठ्या शहरांमध्येदेखील तेथील नागरिक येत आहेत. त्यांना शोधण्याची मोहीम राबविली जात आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाडक्या बहिणींचा पैसा रिकव्हर करण्याचा कोणताही विचार नाही.