अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या:नापिकीमुळे उचलले टोकाचे पाऊल, हिंगोलीच्या पळसोनातील प्रकार

4 hours ago 1
हिंगोली तालुक्यातील पळसोनातील अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने नापिकीमुळे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या प्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 23 रात्री अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पळसोना येथील सुधाकर चव्हाण (३२) यांना पळसोना शिवारात सुमारे दोन एकर शेती आहे. त्यांच्या कुटूंबामध्ये आई, वडिल, पत्नी, मुले असा परिवार असून या शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. यावर्षी त्यांनी शेतामध्ये सोयाबीन, हरभरा व इतर पिके घेतली होती. मात्र अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असून लागवडीचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे रब्बी हंगामात हरभरा पिक हाती येईल अशी अपेक्षा असतांना रब्बीमध्येही ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडरोगाचा प्रादुर्भाव झाला. पैसे नसल्याने फवारणी करणेही शक्य झाले नाही. दरम्यान, नापिकीमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा याची चिंता त्यांना लागली होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. सोमवारी ता. 20 सायंकाळी घरी कोणीही नसतांना त्यांनी घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने त्यांचे कुटुंबिय घरी आले असतांना घराचा दरवाजा बंद दिसला. त्यांनी आवाज दिल्यानंतरही आतून प्रतिसाद मिळत नसल्याने शेजारी गावकऱ्यांना बोलावले. त्यांनी दरवाजा तोडून पाहिले असता सुधाकर यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मदन गव्हाणे, जमादार हाके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी शिलाबाई चव्हाण यांच्या माहितीवरून बासंबा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article