डोंबिवली एमआयडीसीत रिक्षावर झाड कोसळून चालक ठार झाला. Pudhari Photo
Published on
:
24 Jan 2025, 12:51 pm
Updated on
:
24 Jan 2025, 12:51 pm
डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागात गुरूवारी दुपारच्या सुमारास गुलमोहराचे झाड रस्त्याच्या कडेला थांबलेल्या रिक्षावर कोसळले. या दुर्घटनेत सदर रिक्षाचा चालक जबर जखमी झाला. त्याला तात्काळ जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना जखमी रिक्षावाल्याचा मृत्यू झाला. (Dombivli News)
रामदिन लोधी (60) असे मृत्यू पावलेल्या रिक्षा चालकाचे नाव असून ते कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या कोळे गावात राहत होते. डोंबिवली रेल्वे स्टेशन ते एमआयडीसी, कोळेगाव, काटई परिसरात रामदिन लोधी प्रवासी सेवा देत असत. गुरूवारी दुपारी रामदिन एमआयडीसीतील ममता हॉस्पिटलसमोर असलेल्या रस्त्याच्या कडेला रिक्षात बसले होते. इतक्यात गुलमोहराचे जुनाट झाड अचानक उन्मळून रामदिन लोधी यांच्या रिक्षावर कोसळले. बुंधा आणि फांद्यांखाली रिक्षा चेपली गेली. चेपलेल्या रिक्षात अडकून पडलेले रामदिन बचावासाठी ओरडाओरडा करत होते. परिसरातील रहिवासी, पादचाऱ्यांनी धाव घेऊन चेपलेल्या रिक्षात अडकलेल्या रामदिन यांना रिक्षातून बाहेर काढले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जवळच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. (Dombivli News)
तथापी उपचारांपूर्वीच तो मृत झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. एकीकडे मानपाडा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलकडे पाठवून दिला. तर दुसरीकडे अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून झाडाची कापणी केली आणि क्षतिग्रस्त झालेली रिक्षा बाजूला करून रस्ता रहदारीसाठी मोकळा केला. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर रिक्षा चालकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
फुटेजमधील चित्रणामुळे घोळ
अनेक वृत्तवाहिन्यांनी प्रवासी भाडे सोडून थांबलेल्या रिक्षावर झाड कोसळले आणि त्यातील चालकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारित केले. मात्र घटनास्थळी घडलेल्या घटनेचा थरार तेथील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या झाडाखाली दुचाक्यांसह रिक्षा उभ्या होत्या. एक रिक्षावाला प्रवासी भाडे सोडून तेथेच थांबला होता. कोसळलेल्या झाडाने या रिक्षाचा खुर्दा केला. या रिक्षात बसलेल्या चालकाला कोणतीही हानी पोहोचली नाही. मात्र पलीकडे रिक्षात बसलेल्या रामदिन लोधी यांचा बळी गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
एमआयडीसीतील झाडे काही समाजकंटक जाळून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे काही झाडे सुकून चालली आहेत. काही झाडांवर रासायनिक प्रयोग करून त्यांना मारून टाकले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशा समाजकंटकांचा नागरिक शोध घेत आहेत. एमआयडीसीत मागील तीन ते चार वर्षांत काँक्रीट रस्ते कामांसाठी रस्त्यांची खोदाई करण्यात आली. या खोदाईत अनेक जुनाट झाडांची मुळे तुटली आहेत. मातीचा आधार गेल्याने काही झाडे मरणासन्न अवस्थेत आहेत. ही झाडे आता कोसळत असल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात. रस्त्यांची सुरू असलेली कामे आणि सततच्या खोदकामांमुळे जुनाट झाडांची मुळे सैल झाली आहेत. काँक्रीट रस्त्यांमुळे मातीचा आधार निघून गेल्याने झाडे धोकादायक झाली आहेत. एमआयडीसी प्रशासनाने विचार करण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.