पिंपरी : हिंजवडी-माण रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नरजवळ शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी पाचच्या सुमारास एका भीषण अपघातात दोन तरुणींना प्राण गमवावे लागले. भरधाव वेगाने जाणारा रेडिमिक्स डम्पर वळण घेताना अचानक पलटी झाला. दुर्दैवाने, त्याचवेळी दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन तरुणी डम्परखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. अपघाताची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस, वाहतूक पोलीस, आणि अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले आहेत. तीन क्रेनच्या मदतीने डम्पर बाजूला घेण्याचे काम करण्यात आले. दरम्यान, रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
अपघातग्रस्त तरुणींची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली आहे. डम्परच्या चालकाने बेजबाबदार पद्धतीने वाहन चालवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, संबंधित चालकाविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.