रिसोड(Washim) :- पत्नी नवऱ्याला दिर्घायुष्य लाभावे, यासाठी वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाभोवती फेऱ्या मारते. हरितालिकेसारखे विविध व्रत करते. नवऱ्याच्या नावाने कूंकू लावते, मंगळसुत्र घालते, तीळसंक्रांतीला नवऱ्याच्या नावावे वाण देते. हळदी कुंकुवाचे कार्यक्रम तर दोन आठवडे सुरू असतात.
अनेक मान्यवर झाले प्रभावित
यादरम्यान, नवऱ्याच्या नावाने सारखे उखाणे घेते, हे सर्व ती करते. पण नवरा मात्र पत्नीच्या नावाने काहीही करीत नाही. हे लक्षात घेऊन लेखक विनोद बोरे यांनी पत्नी अर्चना बोरे यांच्या नावाने पूर्णांगिनी पुस्तकाचे वाण दिले. त्यांनी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांची तहसील कार्यालयात भेट घेऊन त्यांना पूर्णांगिनी पुस्तकाचे वाण दिले. त्यानंतर पुस्तक वाण देण्याचा उपक्रम नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अजय पाटील यांच्या घरी सायंकाळी पाच वाजता पार पडला. यावेळी विनोद बोरे यांनी डॉ. अजय पाटील यांच्यासह डॉ. संतोष सोनुने, डॉ.माधवराव म्हस्के, डॉ. जी.के. पायघन, सामाजिक कार्यकर्ते दिनकर बोडखे, अरविंद गाभणे यांना पूर्णांगिनी पुस्तकाचे वाण दिले.
नवऱ्यापेक्षाही पत्नी ही सर्वाधिक जबाबदाऱ्या पार पाडत असते
यावेळी उपरोक्त सर्वच मान्यवरांनी विचार व्यक्त केले. जबाबदारीचा अनेकांगी भार पेलून पत्नी ही घराच्या लौकिकात, उत्कर्षात भर घालणारी मेरूमणी आहे. पत्नीचे स्थान, तिचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. आजरोजी तर अनेकांच्या पत्नी घरदार सांभाळून नोकरी अन् विविध व्यवसायातसुद्धा अग्रेसर आहेत. नवऱ्यापेक्षाही पत्नी ही सर्वाधिक जबाबदाऱ्या पार पाडत असते. असे असतानाही ती सातत्याने नवऱ्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रार्थना करीत असते. विनोद बोरे यांनी पत्नीच्या नावाने दिलेले पूर्णांगिनी या पुस्तकाचे वाण बायकोबाबत विचार करायला लावणारे आहे. पत्नीचा त्याग, तिचे समर्पण समाजासमोर आणणारे आहे, असा सूर उपरोक्त मान्यवरांचा होता.
लेखक विनोद बोरे यांच्या पत्नीच्या नावाने वाण देण्याच्या उपक्रमाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. त्या या उपक्रमाने अनेक मान्यवर प्रभावित झाले आहेत.