भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आयर्लंडचे नवनियुक्त पंतप्रधान मायकेल मार्टिन यांचे अभिनंदन केले.(Image source- x)
Published on
:
24 Jan 2025, 8:01 am
Updated on
:
24 Jan 2025, 8:01 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : मायकेल मार्टिन यांची दुसऱ्यांदा आयर्लंडच्या पंतप्रधानपदी म्हणून निवड झाली. गुरुवारी संसदेत झालेल्या मतदानानंतर त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आयर्लंडचे नवनियुक्त पंतप्रधान मायकेल मार्टिन यांचे अभिनंदन केले. पीएम मोदी यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी भारत आयर्लंडसोबत एकत्र काम करण्यास वचनबद्ध आहे.''
"आयर्लंडच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेत असल्याबद्दल मायकेल मार्टिन यांचे अभिनंदन. आम्ही द्विपक्षीय भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी एकत्र काम करण्यास वचनबद्ध आहोत, जी सामायिक मूल्यांचा मजबूत पाया आणि लोकांमधील अतूट संपर्कावर आधारित आहे." असे पीएम मोदी यांनी नमूद केले आहे.
मायकेल मार्टिन यांची दुसऱ्यांदा आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून निवड झाली. त्यासाठी मतदान घेण्यात आले. फियाना फेल पक्षाचे नेते मार्टिन यांच्या बाजूने ९५ मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात ७६ मते मिळाली. यामुळे ते पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होत आहेत. अल जझीराच्या वृत्तानुसार, ते एका आघाडी सरकारचे नेतृत्व करतील. ज्यात फियाना फेल, त्यांचा प्रतिस्पर्धी फाइन गेल आणि अपक्ष खासदारांचा समावेश असेल.
आयर्लंड संसदेत बुधवारी जोरदार गदारोळ झाला होता. यामुळे आयर्लंड संसदेचे कनिष्ठ सभागृह डेलचे कामकाज अनेकवेळा तहकूब करावे लागले होते. यामुळे एका दिवसानंतर मतदान प्रक्रिया घेण्यात आली.
मार्टिन यांची राजकीय वाटचाल
मार्टिन हे आयर्लंड संसदेत सर्वाधिक काळ राहिलेल्या खासदारांपैकी एक आहेत. ते १९८९ मध्ये कॉर्क साउथ सेंट्रल मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले होते. त्यापूर्वी २०२० ते २०२२ दरम्यान ते ताओइसेच राहिले होते. ताओइसेच हा आयरिश शब्द आयर्लंड सरकारचा प्रमुख आणि पंतप्रधानपदासाठी वापरला जातो. मार्टिन यापूर्वी २०२० ते २०२२ दरम्यान पंतप्रधानपदी राहिले होते. युती सरकारमध्ये ठरल्याप्रमाणे फाइन गेल पक्षाचे सायमन हॅरिस २०२७ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारतील.