”दावोसमध्ये एकूण 54 करार कंपन्यांसोबत झाले. या 54 कंपन्यांमधून 11 विदेशी कंपन्या आहेत. तर हिंदुस्थानी कंपन्या या 43 आहेत. याच 43 मधील 31 कंपन्या या महाराष्ट्रामधील आहेत, असं शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आज एका आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महायुती सरकारने दावोसमध्ये केलेल्या करारांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. याचवली बोलताना ते असं म्हणाले आहेत.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ”गेल्या दोन वर्षात जे घटनाबाह्य सरकार होतं, त्यांनी कशी उधळपट्टी केली होती, हे आपण पाहिलं आहे. जे घटनाबाह्य मुख्यमंत्री होते, त्यांनी 28 तासांत 40 कोटी उडवले. दुसऱ्या दौऱ्यात त्यांनी आणखी 40 अधिकाऱ्यांना आपल्या सोबत नेलं, जणू त्यांना (एकनाथ शिंदे) त्यावेळेच्या खर्चावर लाज वाटत नव्हती. मागच्यावर्षीही त्यांनी असंच मोठं प्रतिनिधिमंडळ नेलं होतं. यावेळी एक फरक आणि आनंदाची गोष्ट आहे, यावेळी जास्त पसारा नेला नाही. पहिले एक – दोन दिवस बघून आम्हाला वाटलं की, यातून काही चांगलं निघेल. आपलं राज्य असेल किंवा देशातील कुठल्याही राज्यात परस्पर जेव्हा गुंतवणूक येते ती कुठल्याही राज्याच्या कामामुळे येते. याला आम्ही कोणीही विरोध करत नाही, उलट आनंदच आहे. गेले दोन- तीन दिवस मुख्यमंत्र्यांचं ट्विटर हँडल पाहून असं वाटलं की, इतकी गुंतवणूक अली आहे की, जुनी पेन्शन योजना लगेच लागू होईल. लाडक्या बहिणींना 2100 रुपये काय तर, त्यात आणखी एक- दोन शून्य वाढून ही योजना लगेच लागू करू शकता. यातच एसटीची भाडेवाढ रद्द होणं आता गरजेचं आहे. इतकी गुंतवणूक अली आहे की, ती भाडेवाढ रद्द होणारच, याची आम्हला खात्री पटलेली आहे. एसटीचे विलीनीकरण आणि कर्जमाफीही होईल. कारण इतकी ऐतिहासिक गुंतवणूक आणली आहे की, ती लगेच ट्रान्सलेट होईल की नाही, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. कारण असंच सहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2018 साली त्यांनी महाराष्ट्रासाठी 1650 लाख कोटी रुपये जाहीर केले होते, त्याचं पुढे काय झालं? याचंही उत्तर अद्याप समोर आलं नाही. तरी देखील आम्ही यावर शंका उपस्थित करणार नाही. मात्र एक दोन गोष्टी आपल्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर जाहीर करू. एक म्हणजे जी माहिती समोर आली आहे, त्यानुसार, एकूण 54 करार त्यांनी कंपन्यांसोबत केले आहेत. या 54 कंपन्यांमधून 11 विदेशी कंपन्या आहेत. तर हिंदुस्थानी कंपन्या या 43 आहेत. याच 43 मधील 31 कंपन्या या महाराष्ट्रामधील आहेत.”
आदित्य ठाकरे म्हणाले की, ”यात इतक्या जर महाराष्ट्र आणि भारतातील कंपन्या असतील तर गेले दोन वर्ष मॅग्नेटिक महाराष्ट्र घेऊन येथेच तो कार्यक्रम का नाही केला. यातच दावोसकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. मी देखील दावोसला जाऊन आलो आहे, त्यावेळी माझ्यासोबत सुभाष सरदेसाई, नितीनसाहेब होते. उद्योग, ऊर्जामंत्री आणि मी आम्ही तिघे गेलो होतो. तिथे गेल्यावर आम्हीही करार करून महाराष्ट्रात गुंतवणूक आणली. यात काही विदेशी आणि भारतीय कंपन्या होत्या. मात्र त्याचसोबत तिथे दावोसमध्ये जे जगभरातून लोक येतात, यात महिला, पुरुष, उद्योजक असे वेगवेगळे लोक असतात. त्यांना तिथे भेटण्याची संधी असते. मात्र यावेळी मला एक पाहायला मिळालं, मुख्यमंत्री यांच्या खात्याने किंवा अधिकाऱ्यांनी त्यांचा कार्यक्रम थोडा विचित्र लावला. ते या लोकांना भेटलेच नाही. आपल्याच येथील स्थानिक लोकांमध्ये कुठेतरी हा गुंतवणुकीचा फुगा मोठा वाटावा म्हणून त्यांना व्यस्त ठेवलं. यात बॅलेन्स ठेवणं गरजेचं आहे. ठराविक गुंतवणूक, ठरविक भेटीगाठी असतील, हे होणं गरजेचं आहे. तिथे मुख्यमंत्र्यांनी जाऊन काँग्रेस सेंटर असेल, वेगळ्या नेत्यांशी, उद्योजकांशी बोलणं गरजेचं आहे. मात्र हे कुठेच झालं नाही, हाच कार्यक्रम येथेही होऊ शकला असता. ज्यातून दावोसचा 20 ते 25 कोटींचा खर्च वाचवून तो सह्याद्री असेल किंवा राज्यात मोठा महाराष्ट्र मॅग्नेक्तिक कार्यक्रम घेऊन त्याच्या अर्ध्या किमतीत तुम्ही हेच करू शकला असतात. मग हे करण्यासाठी तिथे बर्फाचे कपडे घालून दावोसला जाण्याची काय गरज होती? मला माहित आहे, याचं उत्तर मिळणार नाही. भाजपकडून टीका होईल. मात्र मला टीकेची पर्वा तिकेची पर्वा नाही, जी सत्य परिस्थिती आहे, ती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.”
”दावोसमध्ये जे एमओयू (MOU) झाले, त्यात जवळपास 4 लाख कोटीचे एमओयू हे एमएमआरडीए आणि सिडकोने केले आहेत. एमएमआरडीए आणि सिडको हे खातं नगरविकास मंत्र्यांचं आहे. म्हणजेच कदाचित नगरविकास मंत्री आपल्या गावी आणि मुख्यमंत्री दावोसच्या गावी, असं झालं आहे. नगरविकासचं आख्ख खातं हे दावोसमध्ये आहे, मुख्यमंत्र्यांसोबत. मात्र नगरविकास मंत्र्यांना निमंत्रण मिळालं की नाही, याचं अद्याप स्पष्टीकरण आलं नाही. मात्र आम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष म्हणून ज्यांच्यावर अन्याय होतो, त्यांच्यासाठी लढत असतो. आज नगरविकास मंत्र्यांवर अन्याय झालेला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसत आहे. आख्ख खातं नेलं, मात्र त्यांना इथंच ठेवलं”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.