राज्यात पुन्हा बर्ड फ्लूचा धोका वाढला असू या आजाराने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. मात्र आता त्यातच आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. चंद्रपूर येथील ट्रांजिट ट्रीटमेंट सेंटर मधील 4 पैकी 2 बिबट्यांची H5N1 अर्थात बर्ड फ्लू ची “सिरो” टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ऍनिमल डिसीसेसचा अहवाल समोर आला असून आता बिबट्यांनाही बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे नागपूरच्या गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील गोरेवाडा येथे 4 वाघांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू झाल्यानंतर चंद्रपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथील प्राण्यांची देखील चाचणी करण्यात आली होती. ती चाचणी आता पॉझिटिव्ह आली आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्या पूर्वी मृत पावलेल्या 4 गिधाडांची देखील बर्ड फ्लू टेस्ट ही पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यातील प्राणिसंग्रहालयांना ‘हाय अलर्ट’ चा इशारा देण्यात आला होता. पण आता तर आता बिबट्यांची बर्ड फ्ल्यू टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
10 दिवसांत 4 गिधाडांचा मृत्यू
दरम्यान 23 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात सोडलेल्या 4 गिधाडांचा चंद्रपूर जिल्ह्यात मृत्यू झाला होता. मृत पावलेल्या सर्व गिधाड्यांना याच ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे आणून पोस्टमॉर्टम करण्यात आले होते. त्यानंतर याच ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर मधून 3 वाघ 11 डिसेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला शिफ्ट करण्यात आले होते. आणि याच 3 वाघांचा डिसेंबर महिन्याच्या 20 ते 23 तारखे दरम्यान, अवघ्या तीन दिवसांत मृत्यू झाला होता. बर्ड फ्लूची लागण झालेल्या गिधाडांमुळेच चंद्रपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर मध्ये ठेवलेले 3 वाघ संक्रमित झाले आणि नंतर त्यांचा नागपूरच्या गोरेवाडा मध्ये मृत्यू झाला असा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे.
आता 4 पैकी 2 बिबट्यांची बर्ड फ्लू चाचणीदेखील पॉझिटिव्ह आल्याने काळजी वाढली असून प्रशासनाचीही चांगलीच धावपळ उडाली आहे.
राज्यात बर्ड फ्लू पसरतोय हातपाय
राज्यात बर्ड फ्लूचा कहर वाढत आहे. लातूर जिल्ह्यातील एका पोल्ट्री फॉर्मवरील 4200 पिल्लं अचानक दगावली आहेत. त्यामुळे प्रशासन खडबडून जागं झालं आहे. दोन ते तीन दिवसातच पिल्ल दगावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रशासनाने या पिल्लांचे सॅम्पल पुणे येथील प्राण्यांशी संबंधित प्रयोगशाळेकडे पाठवले. पिल्लं नेमकी कशामुळे दगावली याची चौकशी आणि तपास करण्यात येत आहे