तुम्ही, आम्ही दिल्लीत केव्हाही जाऊ शकतो:अमित शहांसोबतच्या चर्चेनंतर भुजबळांचे विधान; शहांशी काय चर्चा झाली? हे ही सांगितले
6 hours ago
3
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज नेते छगन भुजबळ आज नाशिकमध्ये एका व्यासपीठावर आले होते. यावेळी शहांनी स्वतःहून भुजबळांना जवळ येऊन बसण्याचे सांगितले. त्यामुळे भुजबळ लवकरच भाजपत जाणार अशी चर्चा रंगली आहे. पण आता भुजबळांनी स्वतःच पुढे येत आपली अमित शहांशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. पण याचवेळी त्यांनी तुम्ही, आम्ही केव्हाही दिल्लीत जाऊ शकतो, असे सूचक विधान केले. आता त्यांच्या या विधानाची चर्चा रंगली आहे. गृहमंत्री अमित शहा आज नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी मालेगावातील माजी सैनिक व शेतकऱ्यांनी अजंग येथे उभारलेल्या 538 एकरांवरील व्यंकटेश्वरा कृषी फार्मला भेट दिली. तसेच शेतकऱ्यांसाठीच्या माती परीक्षण केंद्र व अगरबत्ती कारखान्याचेही उद्घाटन केले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळही उपस्थित होते. अमित शहा कार्यक्रमासाठी व्यासपीठावर दाखल होताच त्यांची नजर भुजबळांवर पडली. त्यांनी त्यांना आपल्याजवळ बोलवत आपल्या जवळच्या खुर्चीवर बसवले. यावेळी दोन्ही नेत्यांत काहीवेळ संवादही झाला. शहांनी स्वतःहून भुजबळांना जवळ बोलावल्यामुळे भुजबळांची भाजपशी जवळीक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेषतः ते लवकरच भाजपच्या गोटात जातील असा दावाही केला जात आहे. अमित शहांसोबत कोणती चर्चा झाली? या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांनी शहांसोबत आपली काय चर्चा झाली? हे स्पष्ट केले. भुजबळ म्हणाले, अमित शहा साहेबांनी मला जवळ बसवले हा त्यांचा मोठेपणा आहे. मी त्यांच्यापासून लांब बसलो होतो. ते पाहून त्यांनी मला जवळच्या खुर्चीवर बसण्याची सूचना केली. यावेळी आमच्यात संक्षिप्त संवाद साधला. त्यात मी सांगितले की हे लोक 3 वर्षांपूर्वी माझ्याकडे आले होते. तेव्हा असे काही होऊ शकते असे मला वाटले नव्हते असे मी सांगितले. त्यावर अमित शहा यांनी या लोकांनी खरोखरच किमया करून दाखवल्याचे सांगितले. आम्हा दोघांत एवढीच चर्चा झाली. राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नाही. अमित शहा यांनी मला तुम्ही भाषण करा अशी विनंतीही केली. पण मी त्यांना सांगितले की, तुम्ही येण्याअगोदरच माझे भाषण सांगितले आहे. पत्रकारांनी यावेळी भुजबळांना अमित शहांनी तुम्हाला दिल्लीत भेटण्यास बोलावले आहे का? असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी दिल्ली ही देशाची राजधानी आहे... तुम्ही, आम्ही केव्हाही दिल्लीत जाऊ शकतो, असे सूचक विधान केले. त्यांच्या या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मालेगावातील बॅनर्सवरून राष्ट्रवादीचे नाव चिन्ह गायब दुसरीकडे, मालेगावात ठिकठिकाणी अमित शहा व छगन भुजबळ यांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आलेत. भुजबळ समर्थक आणि समीर भुजबळ युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून हे बॅनर्स लावण्यात आलेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्ह दिसत नाही. बॅनर्सवर केवळ अमित शहा, समीर भुजबळ व छगन भुजबळ यांचेच फोटो आहेत. त्यामुळे कार्यक्रमस्थळी याचीही जोरात चर्चा सुरू होती. उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकतेच शिर्डीत 2 दिवसीय अधिवेशन झाले. छगन भुजबळ यांनी या शिबिराला नाममात्र हजेरी लावली. त्यांनी अवघ्या 2 तासांतच अधिवेशन स्थळाहून काढता पाय घेतला. छगन भुजबळ हे राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामु्ळे पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)