Published on
:
24 Jan 2025, 7:58 am
Updated on
:
24 Jan 2025, 7:58 am
नगर : राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 26 व 27 जानेवारी रोजी ‘ग्रंथोत्सव 2024’ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार असून, अध्यक्षस्थान विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे हे भूषविणार आहेत.
अहिल्यानगर येथील न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेजच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात दोन दिवसीय ‘ग्रंथोत्सव 2024’ चे आयोजन केले असून, शालेय विद्यार्थींचे देशभक्तीपर समुहगीत गायन, परिसंवाद, व्याख्यान, हास्यतरंग व कविसंमेलनातून दोन दिवस मनोरंजन व ज्ञानाचे आदान प्रदान होणार आहे.
रविवारी सकाळी 10 वाजता ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास दोन्ही खासदार तसेच सर्व आमदार, अधिकारी व जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रा.ह.दरे, सेक्रेटरी अॅड. वि.द.आठरे पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
ग्रंथोत्सवानिमित्त 26 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वाजता शिवाजी महाराज स्मारक (हुतात्मा स्मारक) येथून ग्रंथदिंडी निघणार आहे. ग्रंथदिंडीचा शुभारंभ महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या यांच्या हस्ते होणार आहे.
ग्रंथोत्सवाच्या उदघाटन कार्यक्रमानंतर सकाळी 11 वाजता शालेय विद्यार्थी देशभक्तीपर समूहगीत गायन सादर करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मकरंद खरवंडीकर असणार आहेत. दुपारी 3 वाजता न्यू आर्टस कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘अभिजात मराठी भाषा एक साहित्यिक प्रवास’ या विषयावर परिसंवाद होणार आहे.
सायंकाळी 4 वाजता जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे यांच्या अध्यक्षतेखाली ‘वाचन संस्कृती आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे.
सोमवारी (दि.27) सकाळी 10 वाजता ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, ज्येष्ठ साहित्यिक माजी आ. लहू कानडे, सिनेगीतकार व साहित्यिक बाबासाहेब सौदागर यांच्या उपस्थितीत निमंत्रित कवींचे ‘कविसंमेलन’ होणार आहे.
सकाळी 11.30 वाजता ‘ग्रंथालये : लोकशिक्षणाची संस्कार केंद्रे’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. दुपारी 12.30 वाजता ‘भारतीय ग्रंथालय चळवळीतील आश्रयदाते महाराजा सयाजीराव गायकवाड’ या विषयावर जेष्ठ साहित्यिक बाबा भांड यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. दुपारी 3 वाजता प्रसिद्ध हास्य कवी डॉ. विष्णू सुरासे यांचा ‘हास्यतरंग’ हा विनोदी कवितांवर अधारित रंगतदार कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 4 वाजता समारोप होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी झेडपी साईओ आशिष येरेकर उपस्थित राहणार आहेत.
रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर आणि ग्रंथालय निरीक्षक रामदास शिंदे यांनी केले आहे.