Published on
:
07 Feb 2025, 1:48 am
Updated on
:
07 Feb 2025, 1:48 am
सातारा : अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व अन्य घटकांना राज्य शासनाने वेळोवेळी शासन निकषानुसार मदत जाहीर केली होती. यातील 5 लाख 39 हजार 605 लाभार्थ्यांना 592 कोटी 34 लाख 90 हजार 530 रुपयांची मदत संबंधित लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत डीबीटीद्वारे गुरुवारी वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.‘जेव्हा आभाळ फाटले होते, तेव्हाही सातारा जिल्ह्यात आबाच धावले होते आणि मंत्री झाल्यावर मदतीसाठी संपूर्ण राज्यासाठी पुन्हा आबाच धावून आले’, अशा प्रतिक्रिया राज्यातून उमटल्या आहेत.
आधारसंलग्न बँक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आलेल्या मदतीमध्ये अतिवृष्टी, पूर सन 2022, सन 2023, सन 2024, अवेळी पाऊस 2022-2023, व 2023-2024, अवेळी पाऊस, अतिवृष्टी 2023-2024, दुष्काळ 2023 आणि जून 2019 मध्ये वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या लाभार्थींचा समावेश आहे.
ना. पाटील म्हणाले, या मदतीमध्ये पुणे विभागात 27 हजार 379 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर 40 कोटी 72 लाख 53 हजार 13 रुपयांची मदत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 64 लाभार्थ्यांना 99 लाख 62 हजार 37 रुपये, पुणे जिल्ह्यातील 3 हजार 383 लाभार्थ्यांना 2 कोटी 32 लाख 45 हजार 952 रुपये, सांगली जिल्ह्यातील 1 हजार 787 लाभार्थ्यांना 1 कोटी 77 लाख 44 हजार 279 रुपये आणि सोलापूर जिल्ह्यातील 21 हजार 145 लाभर्थ्यांना 35 कोटी 63 लाख 745 रुपये रुपयांची मदत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आली. अमरावती विभागामध्ये 4 हजार 671 लाभार्थ्यांना 7 कोटी 40 लाख 29 हजार 820 रुपयांची मदत वर्ग केली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 4 लाख 83 हजार 883 लाभार्थींना 514 कोटी 85 लाख 23 हजार 260 रुपयांची मदत वर्ग केली आहे. कोकण विभागामध्ये 865 लाभार्थ्यांना 21 लाख 81 हजार 781 रुपयांची मदत वर्ग केली आहे. नागपूर विभागात 20 हजार 898 लाभार्थ्यांना 26 कोटी 43 लाख 10 हजार 864 रुपये बँक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आले आहेत. नाशिक विभागात 1 हजार 909 लाभार्थ्यांना 2 कोटी 71 लाख 91 हजार 791 रुपयांची मदत वर्ग करण्यात आली आहे.