Published on
:
24 Jan 2025, 4:36 pm
Updated on
:
24 Jan 2025, 4:36 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसीने जाहीर केलेल्या 2024 च्या सर्वोत्तम कसोटी संघात भारताचे स्टार खेळाडू रोहित शर्मा व विराट कोहली यांना स्थान मिळालेले नाही. रोहित व विराट यांच्यासाठी 2024 हे वर्ष काही खास राहिलेले नाही. या दोघांच्या कसोटीतील धावांचा ओघ आटलेला राहिला आणि त्यामुळे त्यांची सर्वोत्तम कसोटी संघात निवड न होणे, निश्चित समजले जात होते. पण, भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल याने या संघात सलामीवीर म्हणून स्थान पटकावले आहे. त्याच्यासोबत भारताच्या जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या दोन खेळाडूंचाही या संघात समावेश केला गेला आहे.
यशस्वीने 2024 मध्ये दमदार कामगिरी केली आहे आणि म्हणूनच त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या वन डे संघात निवडले गेले आहे. यशस्वीने 2024 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दोन द्विशतकांसह 3 शतके झळकावताना 712 धावा केल्या आहेत. बांगला देशविरुद्धच्या घरच्या मैदानावरील कसोटी मालिकेत त्याने चार डावांत तीन अर्धशतके झळकावली. न्यूझीलंडविरुद्ध संघाला खराब कामगिरी करता आली असली तरी यशस्वी चांगला खेळला. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतही त्याने पर्थ कसोटीच्या दुसर्या डावात 161 धावांची खेळी केली होती. एकूण त्याने 2024 मध्ये कसोटीत 554.74 च्या सरासरीने 1478 धावा केल्या आणि जो रूटनंतर सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला.
रोहितला पहिल्या डावात उमर नजीरने त्याला अवघ्या 3 धावांवर बाद केले, पण दुसर्या डावात रोहितने त्याच उमरला उत्तुंग षटकार ठोकला. त्यानंतर आकिब नबी आणि युद्धवीर सिंगच्या गोलंदाजीवर आणखी दोन शॉटस् सहज मारून आपला सर्वोत्तम फॉर्म दाखवला, पण तो त्याचे मोठ्या डावात रूपांतर करू शकला नाही. 35 चेंडूंत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 28 धावा काढल्यानंतर तो युद्धवीर सिंगचा बळी ठरला.
भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानेही या संघात स्थान पटकावले आहे. त्याने 2024 मध्ये 527 धावा केल्या आहेत आणि 48 विकेटस् घेतल्या आहेत. कर्णधार पॅट कमिन्सही या संघात आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ सलग दुसरी कसोटी चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. त्याने मागील वर्षात 37 विकेटस् घेतल्या व 306 धावाही केल्या. न्यूझीलंडचा मॅट हेन्री हा दुसरा जलदगती गोलंदाज आहे आणि त्याने 48 विकेटस् घेतल्या आहेत. भारताच्या जसप्रीत बुमराहशिवाय हा संघ पूर्ण होणे नाही. त्याने 2024 मध्ये 71 विकेटस् घेतल्या आहेत.
वन डे संघात तिघे पाकिस्तानी; भारताचा एकही नाही
शुक्रवारी आयसीसीने 2024 मधील सर्वोत्तम वन डे पुरुष संघाची घोषणा केली आहे. या संघात 2024 मध्ये वन डेत चांगली कामगिरी केलेल्या 11 खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. या वन डे संघात भारताच्या एकाही खेळाडूचा समावेश नाही. मात्र, पाकिस्तानच्या तीन खेळाडूंनाही संघात संधी मिळाली आहे. पाकिस्तानच्या शाहिन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि सईम आयुब यांनाही या संघात संधी मिळाली आहे. भारताने या संपूर्ण वर्षात केवळ 3 वन डे सामने खेळले आहेत, या तीन वन डेतील दोन सामने भारत हरला, तर एक सामना बरोबरीत सुटला.
सईम आयुब (पाकिस्तान), रेहमनुल्लाह गुरबाज (अफगाणिस्तान), पाथुम निसंका (श्रीलंका), कुशल मेंडिस (यष्टिरक्षक) (श्रीलंका), चरिथ असलंका (कर्णधार, श्रीलंका), शेर्फेन रुदरफोर्ड (वेस्ट इंडिज), अझमतुल्ला ओमरझाई (अफगाणिस्तान), वनिंदू हसरंगा (श्रीलंका), शाहिन शाह आफ्रिदी (पाकिस्तान), हॅरिस रौफ (पाकिस्तान), एएम गझनफर (अफगाणिस्तान).
स्मृती, दीप्तीने वाढवला भारतीय महिला संघाचा सन्मान
आयसीसीच्या सर्वोत्तम 2024 वन डे महिला संघात भारताच्या दोन खेळाडूंना संधी मिळाली आहे. यामध्ये भारताची उपकर्णधार स्मृती मानधना आणि अष्टपैलू दीप्ती शर्माचा समावेश आहे. स्मृती आणि दीप्ती या दोघींची कामगिरी 2024 मध्ये शानदार झाली आहे. मानधनाने 2024 या वर्षात सर्वाधिक धावा केल्या. तिने 13 वन डे सामने खेळताना 4 शतके ठोकली तर 3 अर्धशतकांसह 747 धावा केल्या. मानधना या वर्षात भारतासाठी वन डेत सर्वाधिक शतके करणारी खेळाडूही ठरली. त्याचसोबत दीप्तीने 13 वन डेत 186 धावा केल्या, तर 24 विकेटस् घेतल्या. त्यामुळे त्यांना या संघात संधी मिळाली आहे.
आयसीसी सर्वोत्तम 2024 वन डे महिला संघ :
स्मृती मानधना (भारत), लॉरा वॉल्वार्ड (कर्णधार), चामरी अट्टापट्टू (श्रीलंका), हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडिज), मॅरिझन कॅप (दक्षिण आफ्रिका), अॅश्ले गार्डनर (ऑस्ट्रेलिया), अॅनाबेल सदरलँड (ऑस्ट्रेलिया), एमी जोन्स (यष्टिरक्षक) (इंग्लंड), दीप्ती शर्मा (भारत), सोफी इक्लेस्टोन (इंग्लंड), केट क्रॉस (इंग्लंड).