ईव्हीएमलाही शाही स्नान घडवून पापमुक्त करावं – सामनातून टीकास्त्र

3 hours ago 2

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभ सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी मौनी अमावस्येच्या दिवशी शाही स्नान करण्यासाठी कुंभमेळ्यात प्रचंड गर्दी झाली होती आणि त्याच वेळी बॅरिकेड तुटल्याने चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये काही भाविकांना जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले. यामुळे प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. याच मुद्यावरून विरोधकांनी केंद्र सरकार तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडलं. शिवसेना ठाकरे गटाकडूनही या मुद्यावरून हल्ला चढवण्यात आला असून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातूनही निशाणा साधण्यात आला आहे. कुंभ सोहळ्यात महत्त्वाच्या राजकीय व्यक्ती, गौतम अदानींसारखे श्रीमंत शेठ यांच्या कुंभस्नानासाठी प्रशासन चार-चार दिवस राबत असते. कोणताही ओरखडा न उठता त्यांचे गंगास्नान होते व मोक्षाचे दरवाजेही उघडतात, पण स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी धडपडणाऱ्या श्रद्धाळूंना गर्दीत चेंगरून मरावे लागते. प्रयागतीर्थी कुंभमेळ्यात शंभर भाविकांचा मृत्यू झाला तसा देशातील लोकशाहीचाही प्रयागतीर्थी मृत्यू झाला व मृत्यूस कारण ठरलेले अमृतस्नान करून दिल्लीस पोहोचले. जनता मात्र तुडवून तुडवून मारली जात आहे. त्यामुळे मोक्ष कुणाला मिळाला? असा खोचक सवाल सामनामधून विचारण्यात आला आहे.

काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात ?

कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवरून सामनातून सरकारवर टीका करण्यात आली आहे. सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा..

प्रयागराज महाकुंभ मेळ्यात अखेर भयंकर दुर्घटना घडलीच. चेंगराचेंगरीत 30 भाविकांचे बळी गेले. अर्थात 30 हा आकडा खोटा असून प्रत्यक्षात शंभरावर बळी गेल्याचा आंखो देखा हाल आहे. हे सर्व घडल्यावर पंतप्रधान मोदी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. उत्तर प्रदेशचे भगवाधारी मुख्यमंत्री योगी महाराज परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे सांगत आहेत, पण जमिनीवरची हकिकत वेगळी आहे. शंभरावर बळी गेले व अनेक श्रद्धाळू बेपत्ता झाले आहेत. त्यांचे आप्त बेपत्ता नातेवाईकांचा शोध घेत फिरत आहेत. हे सर्व लोक बेपत्ता झाले याचा काय अर्थ घ्यायचा? कुंभमेळा ही श्रद्धा आहे व कुंभमेळ्यातील मौनी अमावास्येला गंगास्नान केल्याने स्वर्गप्राप्ती होते या अंधश्रद्धेतून मंगळवारी मध्यरात्री प्रयागतीर्थी गर्दी वाढली. त्रिवेणी संगमावर स्वर्गप्राप्तीच्या स्नानासाठी प्रचंड संख्येने लोक आले. त्या गर्दीमुळे बॅरिकेड्स तुटून गर्दीचे लोंढे एकमेकांना चिरडत पुढे गेले. लोक चिरडले गेले व त्यांना वाचविण्याची कोणतीही व्यवस्था प्रयागतीर्थी नव्हती. मग कुंभ सोहळ्यासाठी दहा हजार कोटींची जी आर्थिक तरतूद केली आहे, त्या पैशाला नक्की कोठे पाय फुटले? रस्त्यावर झोपलेल्या श्रद्धाळूंना गर्दीने तुडवले हे खरे असेल तर प्रयागतीर्थी श्रद्धाळूंच्या राहण्याखाण्याची, पथारी पसरण्याची कोणतीच व्यवस्था केल्याचे दिसत नाही. मग कुंभ धर्मसोहळ्याची व्यवस्था पाहणाऱ्या लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का होऊ नये? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

भाजप पुढाऱ्यांनी चिंतन केले पाहिजे

प्रयागराज येथे उपस्थित असलेल्या अनेक धर्माचार्यांनी व महामंडलेश्वरांनी कुंभाच्या व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली व ही सर्व व्यवस्था लष्कराकडे सोपवा अशी मागणी केली. या कुंभापेक्षा अखिलेश यादवांच्या काळात झालेल्या कुंभाचे व्यवस्थापन चांगले होते असे उघडपणे बोलले जात असेल तर भाजप पुढाऱ्यांनी त्यावर चिंतन केले पाहिजे. कुंभ सोहळ्यात ‘व्हीव्हीआयपी’ संस्कृतीचा बोलबाला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा यांसारखे अतिसुरक्षा व्यवस्था असलेले लोक संगमावर डुबकी मारण्यासाठी पोहोचतात तेव्हा दिवसभर आठ-दहा किलोमीटरचा परिसर श्रद्धाळूंसाठी बंद केला जातो. त्यामुळे गर्दी वाढतच जाते. कुंभ सोहळ्यात महत्त्वाच्या राजकीय व्यक्ती, गौतम अदानींसारखे श्रीमंत शेठ यांच्या कुंभस्नानासाठी प्रशासन चार-चार दिवस राबत असते. त्यांच्यासाठी सर्व काही राखीव. कोणताही ओरखडा न उठता त्यांचे गंगास्नान होते व मोक्षाचे दरवाजेही उघडतात, पण स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी धडपडणाऱ्या श्रद्धाळूंना गर्दीत चेंगरून मरावे लागते. इतक्या मोठ्या आयोजनात अशा छोट्या-मोठ्या दुर्घटना घडतच असतात, असे योगी सरकारातले ‘भाजप’ मंत्री संजय निषाद सांगतात. शंभर लोक तुडवून मारले ही ज्यांना सामान्य घटना वाटते असे लोक हिंदुत्वाची ध्वजा हाती घेऊन उभे आहेत. कुंभ सोहळ्याचे राजकारण सुरू आहे व त्यासाठी भाजपची यंत्रणा काम करीत आहे. देशात याआधीही भव्य प्रमाणात कुंभ सोहळे पार पडले आहेत, पण भाजपास असे वाटते की, ‘कुंभ’ उत्सव हा त्यांच्यामुळेच 2014 नंतर घडू लागला आहे.

ईव्हीएमलाही शाही स्नान घडवून पापमुक्त कराव

प्रयागराज, हरिद्वार, नाशिक, उज्जैन येथे याआधी पार पडलेले कुंभ सोहळे थाटात झाले व राजकारणविरहीत पार पडले. प्रयागराजच्या 1954 च्या कुंभ सोहळ्याचे निरीक्षण व नियंत्रण स्वतः पंतप्रधान पंडित नेहरूच करीत होते. मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत प्रयागतीर्थी ठाण मांडून होते व श्रद्धाळूंची जातीने विचारपूस करीत होते. आजच्या कुंभमेळ्यात सामान्य श्रद्धाळू रस्त्यावर आणि पंचतारांकित तंबूत व संगमावर फक्त श्रीमंतांचीच विचारपूस सुरू आहे. मौनी अमावास्येला अमृतस्नान करण्यासाठी बुधवारी 9 कोटींहून जास्त भाविक प्रयागराजला पोहोचले. हे सर्व रंजले गांजलेले लोक होते. हे सामान्य लोक गंगेत आपली पापे धुण्यासाठी जात नाहीत, तर एका श्रद्धेने इडापीडा टळावी, मोक्षाचे दार उघडावे यासाठी जातात. गौतम अदानींसारखे लोक मात्र तेथे जातात व अमृतस्नान करतात ते देशातील सर्व सार्वजनिक संपत्ती मोदींनी आपल्या नावे करावी, सर्व ठेके, विमानतळे आपल्यालाच मिळावीत या इच्छेने. त्यामुळे भाजपने त्यांच्यासाठी या भूमीवर स्वर्ग निर्माण केला, पण सामान्यांसाठी मात्र गरिबी, महागाई, बेरोजगारीशी रोजच संघर्ष करावा लागेल, अशी स्थिती निर्माण केली. गंगास्नानाने श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत काय? घोटाळे करून निवडून येणारे व सत्ता राबविणारे कुंभ काळात गंगास्नान करतात. महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेने या काळात एक करावे, भाजपपुरस्कृत ईव्हीएमला वाजत गाजत प्रयागतीर्थी संगमावर न्यावे. ईव्हीएमलाही शाही स्नान घडवून पापमुक्त करावे. प्रयागतीर्थी कुंभमेळ्यात शंभर भाविकांचा मृत्यू झाला तसा देशातील लोकशाहीचाही प्रयागतीर्थी मृत्यू झाला व मृत्यूस कारण ठरलेले अमृतस्नान करून दिल्लीस पोहोचले. जनता मात्र तुडवून तुडवून मारली जात आहे. त्यामुळे मोक्ष कुणाला मिळाला? हा प्रश्नच आहे! अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article