ज्येष्ठ भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा काल विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत त्यांनी पुणेकरांना नेमके काय दिले, या माहितीपेक्षा या मतदारसंघात विद्वेष पसरवणारी भाषा केली. त्याद्वारे त्यांनी कसबा मतदारसंघातील धार्मिक सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचेच काम केले आहे, असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला.
धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर दिले. धंगेकर म्हणाले की, पुण्याच्या कसवा मतदारसंघात सर्व जाती धर्मांचे लोक एकत्र राहतात. पण, येथे धार्मिक विद्वेषाचा खडा टाकून फडणवीस यांनी हे वातावरण बिघडवण्याचे काम केले आहे. त्यांच्या या प्रयत्नांना येथील मतदार जराही भीक घालणार नाहीत. या मतदारसंघात भाजपचा पराभव होत असल्याची जाणीव झाल्यानेच त्यांनी हा प्रयत्न केला असावा, असे मतही धंगेकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, फडणवीस यांनी आपल्यावर व्यक्तिगत टीका करताना मी नाटकी आमदार आहे, अशी भाषा वापरली.
पुण्यातील ड्रग रॅकेट प्रकरण, कार अपघात प्रकरण आणि बेकायदेशीर पब प्रकरण याप्रकरणी मी पोटतिडकीने आवाज उठवला. त्याबाबत पोलिस यंत्रणा आणि सरकारी यंत्रणांना कारवाई करण्यास भाग पाडले. या प्रश्नांबरोबरच या मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्नांबावत मी सातत्याने आवाज उठवला. माझी ही कृती जर फडणवीस यांना नाटक वाटत असेल, तर मी हे नाटक पुढील काळातही करत राहीन.