Published on
:
22 Nov 2024, 12:38 am
Updated on
:
22 Nov 2024, 12:38 am
सोलापूर : जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम सुरू होऊन एक आठवडा होत आहे. अद्यापही बर्याच साखर कारखान्यांनी दर जाहीर केले नाहीत. त्यामुळे शेतकर्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. प्रतिटन उसाला साडेतीन हजार रुपयांचा दर द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांकडून होत आहे.
शुक्रवारी (दि. 15) नोव्हेंबरपासून जिल्ह्यात ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील जवळपास बरेच कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. मात्र, कारखानदारांकडून दर जाहीर न केल्याने दराची कोंडी कायम आहे. तीन हजारांपेक्षा जास्त दर जाहीर करावे, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
जिल्ह्यात 40 साखर कारखाने आहेत. त्यातील सन 2024-25 मध्ये गाळप हंगामात 36 कारखान्यांनी गाळप परवानगी मागणी केली होती. त्यातील अनेक कारखाने सुरू झाले आहेत. तर काही कारखाने येत्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत. जिल्ह्यातील विठ्ठल सहकारी आणि विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यांनी साडेतीन हजारांचा दर जाहीर केला आहे. तसेच इतर कारखान्यांनी अद्यापही एफआरपी दर म्हणजेच रास्त आणि किफायतदार दर जाहीर न केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
गतहंगामात ऊस क्षेत्र कमी होते. त्यामुळे जिल्ह्यातील कारखानदारांनी चढाओढीने ऊस नेला. मात्र, यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असल्याने गाळप हंगाम सुरू होऊन ही कारखान्यांकडून ऊस दर जाहीर केले नाहीत. त्यामुळे कोणता कारखाना किती दर देणार, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
यंदाच्या वर्षी 36 साखर कारखाने ऊस गाळप करणार आहेत. त्यातील काही कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. जिल्ह्यात यंदाच्या वर्षी 125 लाख मेट्रिक टन उसाचे क्षेत्र असल्याने गाळप हंगाम शंभर दिवसांपेक्षा जास्त काळ चालणार आहे.
विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना, विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांनी प्रतिटन उसाला साडेतीन हजारांचा दर जाहीर केला आहे. हे दोन कारखाने वगळता जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला नाही. शेतकर्यांनी कारखान्यास ऊस घालू नये. येत्या आठवडाभरात इतर साखर कारखान्यांनी साडेतीन हजार रुपयांचा भाव जाहीर न केल्यास कारखाने बंद पाडू.
प्रभाकर देशमुख, संस्थापक अध्यक्ष, जनहित शेतकरी संघटना